भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांना दिले जाते बळ

By Admin | Published: April 25, 2016 01:35 AM2016-04-25T01:35:38+5:302016-04-25T01:36:18+5:30

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध संस्था-संघटनांकडून पाणी बचतीसाठी पुढाकार घेतला आहे.

The bread is given to those who search the bread for bread | भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांना दिले जाते बळ

भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांना दिले जाते बळ

googlenewsNext


पिंपरी : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध संस्था-संघटनांकडून पाणी बचतीसाठी पुढाकार घेतला आहे. काही ठिकाणी पाणी वाचवा अभियान सुरू आहे. काहींनी नळकोंडाळी दुरुस्तीचे अभियान घेतले आहे. दुष्काळग्रस्त भागातून शहरात येणाऱ्या बेरोजगारांसाठी रोजगार देणे, दुष्काळग्रस्तांसाठी अन्नछत्र, दुष्काळनिधी गोळा करण्याचे अभियान सुरू करून सामाजिक भावना व्यक्त केली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी कपातीचे नियोजन महापालिकेने केले आहे. पुढील महिन्यापासून दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे. पाणीगळती आणि पाणी वाचविण्यासाठी चिंचवड विधानसभा परिसरात शिवसेनेने प्रबोधन अभियान सुरू केले आहे. त्याबरोबरच मोफत नळकोंडाळे आणि प्रबोधन अभियान राबविले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, तसेच मावळातील पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात दिवसातून एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. पाणीकपातीचे धोरण अवलंबिल्यानंतर पाणी बचतीचे अभियान शिवसेनेने सुरू केले आहे. याविषयी चिंचवड प्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले, ‘‘आपल्या शहरात पिण्याचे पाणी मुबलक असले, तरी पवना धरणातील साठा कमी झाल्याने येत्या दोन महिन्यांत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे.
पाणीगळती रोखणे प्रमुख आव्हान आहे; तसेच अनावश्यक पाण्याचा वापर टाळून आपण पाणी बचत करू शकतो. या अभियानात नागरिकांनीही खारीचा वाटा उचलायला हवा. यासाठी शहरात प्रबोधन अभियान सुरू केले आहे. तसेच पाणीगळती रोखण्यासाठी नळकोंडाळी दुरुस्ती अभियान सुरू केले आहे. शहरातील २५ ठिकाणी आपण प्लंबर नियुक्त केले आहेत.’’

दुष्काळग्रस्तांसाठी अन्नछत्र
राज्यात पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे मराठवाड्यातील जनतेला शहरात स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या दुष्काळग्रस्त भागातील बांधवांसाठी कोकणे चौकात निर्भया महिला मंच, तसेच कोकणे चौक ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ‘मोफत अन्नछत्र’ सुरू झाले आहे.
तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे मराठवाड्यातील जनतेला जगण्यासाठी मोठ्या शहरांचा आसरा घ्यावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात स्थलांतरित नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे निर्भया महिला मंचाने मदतीचा हात पुढे केला आहे. स्थलांतरित लोकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू केले आहे; तसेच नाम फाउंडेशनलाही मदत केली जाणार आहे, अशी माहिती निर्भया महिला मंचाचे अध्यक्ष उल्हास कोकणे यांनी दिली.

दुष्काळग्रस्तांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न

दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जिजाई प्रतिष्ठान व एएसएम ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय रोजगार व कौशल्यविकास महामेळा होणार आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
चिंचवड येथील आॅटो क्लस्टरजवळील आयबीएमआर कॅम्पसमध्ये सोमवारी सकाळी दहाला पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होणार उद्घाटन होणार आहे. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, संजय भेगडे, भीमराव तापकीर, जिजाई प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा नगरसेविका सीमा सावळे, नगरसेविका आशा शेंडगे आदी उपस्थित राहणार आहेत.
जगताप म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मेळाव्यात कौशल्य विकासावर प्राधान्य दिले जाणार आहे. दोन दिवस होणाऱ्या मेळाव्यात दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा होल्डर, पदवीधारक, पदव्युत्तर उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. याखेरीज कमवा व शिका योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या कौशल्य विकास संस्था या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.’’
अशी होऊ शकते पाण्याची बचत
किमान सहा सदस्य असणाऱ्या एका कुटुंबातून दिवसाला साडेसातशे लिटर पाण्याची बचत करू शकतो. शॉवरखाली आंघोळ करण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन आंघोळ केल्यास ४९२ लिटर पाण्याची बचत, स्वच्छतागृहातील फ्लशचा वापर टाळल्यास ८४ लिटर, वाहत्या नळाऐवजी बादलीत कपडे धुण्यातून ८० लिटर, वाहत्या पाण्याऐवजी बादलीने कार धुतल्यास ८२ लिटर अशी पाण्याची बचत करणे शक्य होईल, त्यामुळे पाणी वाचवा असे आवाहन केले आहे.

Web Title: The bread is given to those who search the bread for bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.