जड वाहतूक वाहन परवान्याला ‘प्रशिक्षणा’चा ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 12:05 AM2018-10-28T00:05:33+5:302018-10-28T00:05:59+5:30
जुलैपासून परवाने बंद; चालक परवान्यासाठी इंधन कार्यक्षमता प्रशिक्षण केले बंधनकारक
- विशाल शिर्के
पुणे : केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना इंधन कार्यक्षमता प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. मात्र, नक्की कोणत्या संस्थेतून प्रशिक्षण घ्यायचे याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने जुलै महिन्यापासून जड वाहतुकीचा वाहनचालक परवाना (हेवी व्हेईकल लायसन्स) वितरण बंद पडले आहे. पुणे वगळता अशी प्रशिक्षण देणारी एकही संस्था राज्यात नसल्याने जड वाहतुकीचा चालक होण्याचे स्वप्न पाहणाºया चालकांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
इंधनाचा अपव्यय आणि पर्यायाने प्रदूषणात वाढ होण्यास चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असतो. इंधन कार्यक्षमता वाढावी, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटारव्हेईकल अॅक्टमध्ये सुधारणा केली आहे. त्याबाबतचा अध्यादेश मे २०१८ मध्ये जाहीर झाला असून, नवे बदल १ जुलैपासून देशभरात लागू झाले आहेत. त्यानुसार १२ टनांवरील प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाºया वाहनांच्या चालकांना इंधन कार्यक्षमतेचा एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग पूर्ण करावा लागणार आहे. असा प्रशिक्षण वर्ग केला नसल्यास संबंधितांना परवाना दिला जाणार नाही.
मान्यताप्राप्त संस्थेकडून इंधनाचा कार्यक्षम वापर करून वाहन कसे चालवायचे याचे धडे घ्यावे लागतील. संबंधित वाहनचालकाला ५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहन चालवावे लागेल. प्रत्यक्ष रस्त्यावर आणि वर्गातील पुस्तकी धड्यांच्या माध्यमातून इंधनाचा कार्यक्षम वापर कसा करावा, याबाबत चालकांना प्रशिक्षित करण्यात येईल. वळण घेताना आणि ब्रेक मारताना कोणती काळजी घ्यावी, हेदेखील यात सांगितले जावे, असे मंत्रालयाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. असे प्रशिक्षण वाहनचालक स्कूल अथवा संस्थेकडून करून घ्यावे, असा उल्लेख आहे. मात्र, राज्यात पुण्यातील कासारवाडी येथे एकमेव वाहन चालन प्रशिक्षण व संस्था (आयडीटीआर) आहे. याही संस्थेतून प्रशिक्षण घ्यावे, अशी स्पष्ट सूचना नाही. त्यामुळे पुण्यासह राज्यातील जड वाहनचालकांना इच्छा असूनही प्रशिक्षण घेता येत नाही.
याबाबत माहिती देताना सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सी. एस. चव्हाण म्हणाले, की केंद्र सरकारने जुलै २०१८ पासून वाहनचालकास इंधन कार्यक्षमता प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. पुणे विभागात दररोज असे ८ ते दहा परवाना वितरीत केले जातात. मात्र, अशी प्रशिक्षण देणारी संस्था निश्चित झाली नसल्याने परवाना वितरण बंद आहे.
कासारवाडी येथील वाहन चालन प्रशिक्षण व संस्थेत (आयडीटीआर) व्हेईकल हेल्थ मॉनिटरिंग प्रणाली असल्याने वाहनचालकांनी कोणती चूक केल्याचे लक्षात येते. त्यामुळे या संस्थेला प्रशिक्षण संस्थेची मान्यता द्यावी, असा प्रस्ताव राज्य परिवहन विभागाला पाठविला आहे.
- बाबासाहेब आजरी,
प्रादेशिक परिवहन अधिकारी