Breaking: आरोग्य भरतीचा पेपर न्यासा कंपनीतूनही फुटला; पेपरफुटीच्या दोन लिंक उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 12:03 PM2021-12-28T12:03:34+5:302021-12-28T12:17:57+5:30
आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी दोन लिंक समोर आल्या आहेत
पुणे: सध्या राज्यभर अनेक पेपरफुट प्रकरणे गाजत आहेत. अशात आरोग्य भरती पेपरफुटीप्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीतूनच गट 'क' चा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी 2 एजंटना पोलिसांनी अटक केली आहे.
न्यासा कंपनीने जिथून पेपर प्रिंट केला, तिथूनच तो दलालांना पुरविला गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यावरून 2 एजंटना अटक करण्यात आली आहे.पेपरफुटीप्रकरणी निशीद रामहरी गायकवाड आणि राहुल धनराज लिंघोट (दोघेही राहणारे अमरावती) या दोन आरोपींना अटक केली आहे. या एजंटनी फोडलेले पेपर काही परिक्षार्थींना 5 ते 8 लाख रुपये घेऊन दिल्याचेही समोर आले आहे.
पेपरफुटीच्या दोन लिंक-
आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी दोन लिंक समोर आल्या आहेत. पहिल्यांदा महेश बोटलेने (तत्कालिन सह संचालक आरोग्य विभाग, मुंबई) पेपर फोडल्याचे समोर आले होते. त्यावेळी प्रशांत बडगिरे (तत्कालिन मुख्य प्रशाकिय अधिकारी, आरोग्य विभाग लातूर) आणि डॉ. संदीप जोगदंड (तत्कालिन वैद्यकिय अधिकारी, आरोग्य विभाग लातूर), राजेंद्र सानप यांनाही अटक करण्यात आली होती. आता हा पेपर जिथून प्रिंट झाला तिथूनच फुटला असल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे या पेपरफुटीच्या दोन लिंक आतापर्यंतच्या तपासात समोर आल्या आहेत.
यामुळे आता आरोग्य भरती गट क परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी आतापर्यंत 5 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच यामध्ये आतापर्यंत २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर जवळपास 6 कोटींची मालमत्ताही जप्त करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.