पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे यांच्या सांगण्यावरून लाच स्विकारली असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन यांनी लाचलुचपत प्रबिबंधक विभागाला (एसीबीला) दिली आहे. शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी मेनन यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना सांगवी येथील नॅशनल इंग्लिश स्कूल कार्यालयात मेनन (वय ४५, रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि क्लार्क महादेव मच्छिंद्र सारुख (वय ४७, रा़. डहाणूकर कॉलनी, कोथरुड) यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी मेनन व सारुखला विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शिक्षण संस्थेत आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत शिकणा-या मुलांचे अनुदान शासनाकडून मिळते़ शासनाचे हे अनुदान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मंजूर केले जाते़ त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानाचे १७ लाख रुपयांचे बील मंजूर करण्याचे काम शिल्पा मेमन यांच्याकडे होते़ ते बील मंजूर करून रक्कम देण्यासाठी मेमन यांनी दीड लाख रुपयांची (१० टक्के) लाच मागितली होती. परंतु, लाच देणे मान्य नसल्याने याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेतली होती. मेनन यांनी लाचेची रक्कम मी दराडे मॅडमच्या सांगण्यावरून स्विकारण्यास गेले असल्याचे एसीबीला सांगितले आहे. या गुन्ह्यात त्यांचा खरोखर सहभाग आहे का ? याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. लाचेची रक्कम ही मोठी असून त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याबाबत तपास करायचा आहे. आरोपींचे रेकॉर्ड तपासून आणखी कोणाकडून लाच स्विकारली आहे का आबाबतचाही तपास करणे आवश्यक आहे. मेनन आणि सारूक या दोघांच्याही आवाजाचे नमुणे घेणे आवश्यक असल्याने दोघांनाही पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. एसीबी पुणे पोलिस निरीक्षक अरूण घोडके गुन्ह्याचा तपास करत आहेत.
..............
आरोपामध्ये तथ्य नाहीसबंधीत शाळेची काय काय तक्रार आहे, हे पाहून शाळेची शुल्क प्रतिपूर्ती करण्यास मेनन यांना सांगितले होते. मेनन यांनी माझ्या सांगण्यावरून पैसे घेतल्याच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. - शैलजा दराडे, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे