ब्रिटिशकालीन तलावात अत्यल्प साठा, २८ लाख वीजबिल थकबाकीत अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:37 AM2018-03-15T01:37:59+5:302018-03-15T01:37:59+5:30
बारामती तालुक्यातील सुप्यासह जिरायती पट्टयातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे त्वरित पाणी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
सुपे : बारामती तालुक्यातील सुप्यासह जिरायती पट्टयातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे त्वरित पाणी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. मात्र जनाईचे पाणी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सुमारे २८ लाख वीजबिलाच्या थकबाकीत अडकले आहे. तसेच ब्रिटिशकालीन तलावातही अत्यल्प पाणीसाठा राहिलेला आहे.
यावर्षी सुपे परगण्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मागील दोन महिन्यांपासून जनाई योजनेतून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. येथील शेतकरी वीजबिलाची रक्कम भरण्यास तयार होते.
मात्र मागणी करूनही २८ लाख थकबाकी असल्याने पाणी सोडण्यात आले नाही.
त्यामुळे अनेक गावांचे तलाव कोरडे पडल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटंकती करावी लागत आहे. सुपे येथील ब्रिटिशकालीन तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे येथे पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या तलावांतर्गत इतर गावांना नळ-पाणीपुरवठा सुरू आहे.
>तलावातील पाणी कमी झाल्याने प्राण्यांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बबनराव वाघ, संजय दरेकर यांनी दिली. दरम्यान, जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे तातडीने पाणी सोडण्याबाबत शेकडो सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व पाटबंधारे प्रकल्प विभागाला दिल्याची माहिती वाघ
यांनी दिली.