पुणे/किरण शिंदे: पुण्यातील वारजे भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याचा वादातून तरुणांनी ३ लहान बहिणींवर लोखंडी रॉड, पाईपने हल्ला केला आहे. या हल्ल्यात ३ अल्पवयीन मुली गंभीर जखमी आल्या आहेत. कृष्णा सहानी यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर २ जणांना पोलिसांनीअटक केली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास वारजेतील दांगट वस्ती जवळ घडली. फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही मित्र आहेत. या दोघांमध्ये मैदानावर क्रिकेटच्या खेळावरून काही वाद झाले होते. या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी कृष्णा याला मारण्यासाठी थेट घरात प्रवेश केला. यावेळी आरोपींना कृष्णा दिसला नाही. त्यामुळे त्यांनी घरातील उपस्थित असलेल्या महिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात कृष्णा यांची आई तसेच तीन लहान बहिणी यांच्यावर रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन साथीदारांनी हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या लहान मुलींना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून यातील दोन जणींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर वारजे पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.