भावाच्या मित्राने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर प्रकरणाचा उलगडा
By नितीश गोवंडे | Published: December 4, 2023 01:01 PM2023-12-04T13:01:37+5:302023-12-04T13:03:58+5:30
याप्रकरणी १६ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे : भावाच्या मित्राने अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वेळोवेळी फोन करून, तुला सुखात ठेवीन असे सांगत प्रेमसंबंध निर्माण केले. यानंतर प्रकरण इतके पुढे गेले की आरोपीने १६ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. ती चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर अखेर हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी १६ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ वर्षीय पीडितेने रविवारी (दि. ३) पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून गणेश उर्फ दीपक जाधव (रा. कात्रजगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आरोपी गणेश जाधव याच्या घरी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाचा मित्र आहे. आरोपीने मुलीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिला वेळोवेळी फोन करत, तुला सुखात ठेवीन असे सांगून मुलीला स्वत:च्या घरी बोलवून घेतले. यानंतर आरोपीने मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यातून मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार तिच्या घरच्यांसमोर उघडकीस झाला. यानंतर कुटुंबियांनी पीडितेला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता तिने घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी लगेचच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घोगरे या करत आहेत.