पुणे : कोट्यवधी रुपये खर्च करून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात उभारलेले बीआरटी मार्ग बस प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत आहेत. मार्गातील बहुतेक सर्व थांब्याचे दरवाजे सताड उघडे असल्याने प्रवासी धोकादायक पध्दतीने बसची वाट पाहत उभे राहत आहेत. थांब्यांमधील डिजिटल फलक बंद असल्याने प्रवाशांना बसचा ठावठिकाणा समजत नाही. अनेक थांब्यांमध्ये अस्वच्छता व अन्य लोकांच्या वावरामुळे थांब्यांची दुरावस्था झाली आहे. जलद गतीने बस प्रवास होण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बीआरटी मार्ग सुरू केले आहे. पुण्यातील संगमवाडी ते विश्रांतवाडी हा एकमेव पुर्ण मार्ग सुरू आहे. तर नगर रस्त्यावरील बीआरटी अर्धवट स्थितीत आहे. पिंपरी चिंचवडमधील मार्गांची ही अवस्था आहे. सध्या सुरू असलेल्या बीआरटी मार्गांची स्थिती फारशी चांगली नाही . या मार्गांवर धावणाऱ्या बसचे उत्पन्न इतर मार्गांवरील बसच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. प्रवाशांकडूनही या मार्गांना चांगला प्रतिसाद मिळतो. पण मार्गांच्या देखभाल-दुरूस्तीकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या मार्गांवर धावणाऱ्या बसवर पीएमपीच्या नियंत्रण कक्षातून नियंत्रण ठेवले जात होते. पण इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) यंत्रणाच बंद पडल्याने हे काम ठप्प झाले आहे.स्थानकांवर बसची माहिती देणारी डिजिटल फलक बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसची माहिती मिळत नाही. बसथांब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविले आहेत. पण ही यंत्रणा बंद असल्याने दरवाजे सताड उघडे असतात. बस येण्यापुर्वी प्रवासी या ठिकाणी धोकादायक पध्दतीने बस वाट पाहत असतात. हा दरवाजा रस्त्यापासून काही फूट उंच आहे. बीआरटी मार्गापासून पुढे मुख्य रस्ता ओलांडताना आजही प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागते. सुरक्षेच्यादृष्टीने तिथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा निर्माण केलेल्या नाहीत. थांब्याच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. थांब्याची स्वच्छताही केली जात नाही. मार्गांमध्ये होणारी इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यात अपयश येत आहे. त्यामुळे बीआरटी बसचा वेगही मंदावला आहे. .......बीआरटी दरवाजाची स्वयंचलित यंत्रणा बंद करून सुरक्षा कर्मचाºयांमार्फत चालवली जाते. हे कर्मचारी कायम दरवाजे उघडे ठेवत आहेत. त्यामुळे प्रवाशांची अडचण होत आहे व सुरक्षिततेचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे. यासंदर्भात असंख्य तक्रारी करूनही पीएमपी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पीएमपी व महानगरपालिका प्रशासन एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच जागे होणार का? अशा अकार्यक्षम अधिकाºयांवर कारवाई व्हायला हवी. - संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच