बीआरटीएस मार्ग : निगडी ते दापोडीदरम्यानची कामे अपूर्णावस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:30 AM2018-08-24T03:30:36+5:302018-08-24T03:31:00+5:30
मेट्रोच्या कामामुळे बीआरटीएसला अडथळ्यांची शर्यत आहे.
पिंपरी : दापोडी ते निगडी बीआरटी मार्गाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. मेट्रोच्या कामामुळे बीआरटीएसला अडथळ्यांची शर्यत आहे. ‘लोकमत’ने पाहणी केली असता ही बाब समोर आली.
दापोडी ते निगडी बीआरटीची स्थिती पाहणी करण्यात आली आहे़ दापोडी येथील बीआरटी बसथांब्याच्या छताची दुरवस्था झाली आहे. फुगेवाडी येथे बीआरटी बसथांब्याच्या बाजूलाच सहा मोठे खड्डे आहेत. त्यानंतर कासारवाडी येथे महामेट्रोचे काम सुरू आहे. ते काम बीआरटीच्या मार्गावरच सुरू आहे. बीआरटी मार्गावर लोखंडी सळया, सिमेंट, वाळू, काळी माती, मुरूम पडून आहे. या ठिकाणी रस्त्याची खोदाई सुरू आहे.
कासारवाडी येथील बीआरटीचा बसथांबासुद्धा वापरात येऊ शकत नाही. एच. ए. कंपनीजवळ बॅरिकेडस लावण्यात आले आहेत. त्यामुळे तो मार्गदेखील बंद आहे. मोरवाडी ते आकुर्डीपर्यंत कर्मचारी बीआरटी मार्गाचे काम करत आहेत. आकुर्डी येथील बीआरटी मार्गावरील एका बसथांब्याचे काम अपूर्ण आहे. आकुर्डीच्या पुढे बीआरटी मार्गाचे काम सुरू आहे.
एम्पायर इस्टेट येथे बसथांब्याची समोरील बाजू तुटलेली आहे. महापालिकेच्या समोर मेट्रोचे काम सुरू आहे. तेथे माती, लोखंडी गज, मुरूम, सिमेंट आदी साहित्य पडून आहे. त्यामुळे या मार्गाचाही वापर करता येणार नाही. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून दापोडीकडे जाताना मेट्रोच्या पिलरचे काम सुरू आहे.
फुगेवाडी येथे बीआरटी मार्गावर पाणी साचलेले आहे. तेथे मोठा खड्डा आहे. सीएमई येथे बॅरिकेडस वाकलेले आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गात अपघात होण्याची शक्यता आहे. दापोडीपर्यंत महामेट्रोचे काम सुरू आहे. बीआरटी मार्गाची स्थिती गंभीर आहे. जागोजागी महामेट्रोचे काम सुरू आहे. बीआरटी मार्ग बंदच असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीची गरज आहे.