नेरे : विसगाव खोऱ्यातील बालवडी (ता. भोर) येथे बुधवारी (दि. 24) पहाटे पाचच्या सुमारास विठ्ठल खाशाबा किंद्रे हे शेतकरी शेतात दोन बैलांना चारण्यासाठी घेऊन गेले असता रानडुक्कर मारण्यासाठी पेरलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन एक बैल जखमी होऊन काही वेळानंतर मृत्युमुखी पडला.नेरे, बालवडी, आंबाडे, गोकवडी या परिसरात फाशी पारध्यांची पंधरा ते वीस लोकांची टोळी आली आहे. हे आपली उपजीविका भागवण्यासाठी रात्रीच्या वेळी छोटे-छोटे बॉम्ब ठेऊन रानडुकरांनी शिकार करतात. विठ्ठल किंद्रे यांच्या गवताच्या रानात असेच बॉम्ब ठेवल्याने बैल चारा खात असताना बैलाचे तोंडाजवळच बॉम्बचा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत किंद्रे सुदैवाने बचावले. पशुवैद्यकीय विकास अधिकारी डॉ. एस. एस. भोईर व पशुधन पर्यवेक्षक डॉ. पी. बी. पानबुडे यांनी या जखमी बैलावर उपचार सुरु केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला आहे. बैल चरण्यासाठी गेला असता स्फोट झाला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हा स्फोट नेमका कशाचा होता आणि कसा झाला याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. याबाबतचा तपास सुरु असून स्फोटकांबाबतची माहिती गोळा करण्यात येत आहे.
भोर तालुक्यात डुकरांसाठी पेरलेल्या बॉम्बच्या स्फोटात बैलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 8:37 PM
नेरे, बालवडी, आंबाडे, गोकवडी या परिसरात फाशी पारध्यांची पंधरा ते वीस लोकांची टोळी आली आहे. हे आपली उपजीविका भागवण्यासाठी रात्रीच्या वेळी छोटे-छोटे बॉम्ब ठेऊन रानडुकरांनी शिकार करतात.
ठळक मुद्देशेतकरी बचावला : पोलिसांचा तपास सुरु