मौजमजेसाठी सायकलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला अटक; सहा सायकल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 06:32 PM2021-01-29T18:32:34+5:302021-01-29T18:34:00+5:30
गेल्या काही दिवसात येरवडा भागातून महागड्या सायकलींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या.
पुणे : मौजमजेसाठी महागड्या सायकलींची चोरी करून संकेतस्थळासह परस्पर विकणाऱ्या बंटी बबलीला येरवडा पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ४१ हजार ५०० रुपयांच्या सहा सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसात येरवडा भागातून महागड्या सायकलींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. पुणे नगर रस्त्यावरील वाडिया बंगल्याजवळ एक अल्पवयीन मुलगा आणि युवती थांबले असून, नागरिकांना सायकल विक्री करत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस शिपाई समीर भोरडे, सुनील नागलोत आणि किरण घुटे यांना मिळाली. पोलिसांनी सतरा वर्षीय मुलगा आणि त्याच्या बरोबर असलेल्या एकोणीस वर्षीय युवतीला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मौजमजेसाठी सायकली चोरल्याची कबुली दिली. दोघांनी काही सायकली संकेतस्थळाच्या माध्यमातून विक्री केल्याची माहिती तपासात उघड झाली. त्यांच्याकडून सहा सायकली जप्त करण्यात आल्या असून तीन सायकली महागड्या आहेत.
पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस शेख, अजय वाघमारे, सहाय्यक निरीक्षक समीर करपे, गणपत थिकोळे यांनी ही कारवाई केली.