चिंचवड : विद्यानगर प्रभागातील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान रविवारी शांततेत झाले. एकूण १० हजार २०८ पैकी ५२०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ५१.०३ टक्के मतदान झाले. पाच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी सकाळी मतमोजणी होणार असून, सकाळी अकरापर्यंत निकाल हाती येणार आहे. विद्यानगर प्रभाग क्रमांक प्रभाग आठचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचा अनुसूचित जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविला होता. त्यानंतर शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यानंतर जातप्रमाणपत्राचे विषय प्रचारातही गाजला होता. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही भाजपा आणि सेनेच्या उमेदवारांवर टीका केली होती. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. रविवारी सकाळी साडेसातला प्रभागातील १३ मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. पहिल्या टप्प्यात साडेअकरापर्यंत मतदानाचा ओघ कमी होता. १४.१६ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी बारा ते तीन या वेळेत उन्हाचा तडाखा अधिक असल्याने मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवून आला. दुपारी दीडपर्यंत २२.१९ टक्के मतदान झाले. (वार्ताहर)दिवसभर रंगल्या चर्चा या निवडणुकीत एकूण बारापैकी सात जणांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे सतीश भोसले, राष्ट्रवादीचे दत्तात्रय मोरे, भारतीय जनता पक्षाचे भीमा बोबडे, शिवसेनेचे राम पात्रे, भारिपच्या शारदा बनसोडे असे पाच उमेदवार रिंगणात होते. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. भाजपाचे खासदार अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांनी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे कोणत्या पक्षाचा विजय होणार याबाबत आज कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे सेना, भाजपा की, राष्ट्रवादी अशी चर्चा आज दिवसभर रंगली होती.
पोटनिवडणुकीत ५१ टक्के मतदान
By admin | Published: April 18, 2016 2:59 AM