बायपास रस्ता झालाय धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:30 PM2018-07-19T23:30:32+5:302018-07-19T23:30:41+5:30
अनेक वेळा निवेदने देऊनही रस्ते बांधकाम विभागाचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले
वाघापूर : दिवे घाटातून पुरंदर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर झेंडेवाडी ते कुंभारवळण असा वनपुरीमार्गे बायपास रस्ता महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी तयार केला आहे. परंतु या संपूर्ण मार्गावर रस्ते बांधकाम विभागाने सूचनाफलक, दिशादर्शक फलक, साईड पट्टे अथवा रात्रीच्या वेळी दिसणारे रिफ्लेक्टर दिवे बसविलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्याने गेल्या दोन वर्षांत अनेक मोठे अपघात होऊन कित्येक जणांचे प्राण गेले आहेत.
याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा निवेदने देऊनही रस्ते बांधकाम विभागाचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून आलेआहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एवढे होऊनही सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग मात्र सुस्तच असल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, वाघापूर, माळशीरस तसेच यवत आणि वाघापूरमार्गे, उरुळी, कांचन या रस्त्यांना मिळण्यासाठी झेंडेवाडी
ते वनपुरी या मार्गाचा अवलंब केला आहे. या रस्त्यावरून वाहतूक केल्याने सासवड येथे येण्याची गरज नसते तसेच किमान पाच किलो मीटरचे अंतर वाचत असल्यामुळे वेळ आणि इंधन यांचीही बचत होत आहे. यामुळे या मार्गाला वाहनचालकांची पहिली पसंती आहे. परंतु केवळ रस्ते बांधकाम विभागाचा हलगर्जीपणामुळे आता अनेकांच्या जिवावर बेतला आहे.
या ठिकाणी आजपर्यंत किमान सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू आणि कित्येक जखमी झाल्याचे घाटना घडल्या आहेत.
तर येथे मोठया घटना घडण्याचीही शक्यता आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींसह एकाही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
>एकही दिशादर्शक फलक नाही...
झेंडेवाडीपासून पूर्वेकडे दिवे, सोनोरी, वनपुरी आणि कुंभारवळण आणि पुढे पारगाव-मेमाणे या रस्त्याला हा रस्ता मिळतो. वास्तविक, या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करायला हव्या होत्या; मात्र संपूर्ण मार्गावर एकही दिशादर्शक फलक, वळण, पारदर्शक दिवे अथवा गावांचे बोर्ड अथवा झेब्रा क्रॉसिंग पट्टे असे कुठलेच फलक न लावल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाहीत
आणि त्यामुळे वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत.
विशेषत: वनपुरीजवळ झेंडेवाडी ते कुंभारवळण आणि सासवड ते वाघापूर असा चौफुला तयार झाला असून चारही बाजूंनी अखंड वाहतूक सुरू असते. तसेच, या संपूर्ण मार्गावर रस्त्यालगत अनेक मोठमोठी झाडे असून त्यामुळेही वाहनचालकांना अंदाज येत नाही. यामुळे मार्गावर विविध कामांची मागणी वाहनचालक तसेच स्थानिकांकडून वारंवार केली जाते. तसेच याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अनेक नागरिक आणि संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.