भाईचा बर्थडे! तलवारीने केक कापणारी टोळकी वाढली; वाढदिवसाचा 'मुळशी पॅटर्न' ठरतोय डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 01:37 AM2019-02-02T01:37:15+5:302019-02-02T06:47:39+5:30
‘भाई का बड्डे वाजले बारा’ असे म्हणत मित्रपरिवाराचे वाढदिवस थाटात करण्याची संस्कृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
भिगवण : ‘भाई का बड्डे वाजले बारा’ असे म्हणत मित्रपरिवाराचे वाढदिवस थाटात करण्याची संस्कृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये भर रस्त्यावर तलवारीने केक कापणाऱ्या टोळक्याची संख्या अधिक आहे. वाढदिवसाच्या आनंदी वातावरणात गटातटातील वाद उफाळून आल्याने अनेक ठिकाणी वातावरण गंभीर झाल्याचेही प्रसंग घडतात. त्यामुळे पोलिसांनी याकडे पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिक करीत आहेत.
आपल्या मित्राचा वाढदिवस सर्व मित्रमंडळीना हि आनंदाची पर्वणीच असते. मात्र ,या वाढदिवस साजरा करण्याची फॅड शहरात मोठ्या प्रमाणावर होती. त्याची बीजे आता ग्रामीण भागात रुजण्यास सुरवात झाल्याचे दिसून येत आहे. भिगवण परिसरात रात्री बारा वाजले आणि तोफा आणि फटाक्याचा आवाज सुरु झाला कि कोणाचा तरी वाढदिवस आहे, हे समजून येते.स्टंटबाजीतुन वाढदिवस साजरे करण्याची विकृती घुसत असल्याचे दिसून येत आहे. ‘बर्थ डे बॉय’ च्या डोक्यात अंडी फोडणे, केक नाकातोंडात भरविणे अशा पद्धतीने सुरवात होते. १०० च्या वर असणाºया तोफांचे आवाज काढण्यात येतात. यावेळी किती वाजलेत याचा विचार न करता डीजे च्या आवाजात धुंद होवून तरुणाचा घोळका मोठ्या प्रमाणावर गोंधळ करताना दिसून येतो. तर आज काल दादाचा ग्रुप ,भाऊचा ग्रुप असे एक ना अनेक ग्रुप गाड्यांचा ताफा घेवून मोठ्या संख्येने वाढ दिवस साजरा करताना गर्दी करताना दिसून येतात. वाढदिवसाच्या वेळी काही जण तर केक कापण्यासाठी तलवारीचा वापर होत असल्याचा तक्रारी नागरिक करीत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक काम करणाºया तरुणांची संख्याही कमी नाही.काहीजण आपल्या वाढदिवसा दिवशी पिडीत आणि वंचित बालकांना सुविधा पुरवून वाढदिवस साजरा करताना आढळून येतात.
येथील पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तरुणांनी असे वाढदिवस साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे भान राखण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच वाढ दिवस साजरा करताना तलवारीचा वापर केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करीत आर्मअॅकट अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.
न्यायालयाचा अवमान तरी पोलीस शांत
रात्री दहानंतर वाद्य वाजविणे, फटाके फोडणे यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तरी देखील वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता वाद्य वाजवून फटाके फोडले जातात. त्यामुळे न्यायालयाचा अवमान खुलेआम होतो आहे. मात्र तरीदेखील पोलीस कोणाच्या तक्रारीची वाट पाहतात हे समजत नाही. वास्तविक सुमोटो पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक असताना तशी कारवाई केली जात नाही.