प्लॅस्टिकविरोधात मोहीम : तीन तासांत सात हजार किलो कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:45 AM2018-05-07T03:45:23+5:302018-05-07T03:45:23+5:30
प्लॅस्टिकविरोधात महापालिकेने काढलेल्या लाँग मार्चमध्ये तीन तासांत तब्बल ६ हजार ८८३ किलो प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात आला. प्लॅस्टिकचा वापर करू नये, यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता.
पुणे - प्लॅस्टिकविरोधात महापालिकेने काढलेल्या लाँग मार्चमध्ये तीन तासांत तब्बल ६ हजार ८८३ किलो प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात आला. प्लॅस्टिकचा वापर करू नये, यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता.
महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मंडई येथून सकाळीच मोर्चाला सुरुवात करण्यात आली. महापाालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मोर्चाचे संयोजन केले.खासदार अनिल शिरोळे, आयुक्त सौरभ राव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप, नगरसेवक हेमंत रासने, राजेश येनपुरे, गायत्री खडके, विजयालक्ष्मी हरिहर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात जनवाणी व संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर
केले. अण्णाभाऊ साठे श्रमिक कलापथकाने प्रबोधन करणारी गाणी सादर केली.
तीन तासांच्या या कचरा संकलन मोहिमेत आज सकाळी तीन तासांत ६८८३ किलो कचरा जमा झाला. त्यात ५८८० किलो प्लॅस्टिक, १७५८ किलो थर्माकोल व २२५.३ किलो ई-कचऱ्याचा समावेश होता. महापालिकेच्या सर्व आरोग्य कोठ्यांमध्ये यापुढेही दोन महिने कचरा जमा करण्यात येणार असून, नागरिकांनी त्यासाठी तिथे संपर्क साधावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी या वेळी केले.
‘स्वत:पासून सुरुवात करावी’
स्वच्छ व पर्यावरणपूरक शहराची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून केली पाहिजे, असे महापौर टिळक म्हणाल्या. कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी नागरिकांनी चांगले पर्याय सुचवावेत, असे आवाहन त्यांनी केले व त्या सूचनांचा प्रशासन नक्की विचार करेल, असे आश्वासन दिले. खासदार शिरोळे यांनी कोणत्याही मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो, त्याशिवाय ती मोहीम यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर बंद करावा व या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कचरा टाकण्यासाठी नागरिकांना पर्याय उपलब्ध करून देण्यात येतील, प्रशासनाला तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे आयुक्त राव यांनी सांगितले.