संरक्षणविनाच कालवे, ठिकठिकाणी पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 03:49 AM2018-09-29T03:49:18+5:302018-09-29T03:49:38+5:30

बकाल, भयाण अवस्थेत सध्या शहरातील सर्वच कालव्यांच्या भिंती आहेत. प्रशासनाकडे या कालव्याच्या दुरुस्ती, डागडुजीविषयी अनेकदा तक्रार केल्या; परंतु त्याकडे काणाडोळा होत आहे.

 Canal without protection, downstream collapse | संरक्षणविनाच कालवे, ठिकठिकाणी पडझड

संरक्षणविनाच कालवे, ठिकठिकाणी पडझड

Next

- युगंधर ताजणे
पुणे - बकाल, भयाण अवस्थेत सध्या शहरातील सर्वच कालव्यांच्या भिंती आहेत. प्रशासनाकडे या कालव्याच्या दुरुस्ती, डागडुजीविषयी अनेकदा तक्रार केल्या; परंतु त्याकडे काणाडोळा होत आहे. या दुर्लक्षाचा परिणाम गुरुवारी दांडेकर पुलालगतच्या झोपडपट्टीत पाहायला मिळाले. शहरातून वाहणाऱ्या कालव्याला मजबूत भिंत बांधली जावी, अशी अपेक्षा ठिकठिकाणच्या रहिवाशांनी व्यक्त केली.
गुरुवारी दांडेकर पुलाजवळ घडलेल्या जलतांडवामुळे शुक्रवारी ‘लोकमत’ने शहरातील विविध भागांत असणाºया कालव्याच्या भिंतीची पाहणी केली. त्यावरून प्रशासनाने तातडीने कालव्याच्या भिंतीची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे दिसून आले. या वेळी सिंहगड रस्ता, वडगाव धायरी, स्वारगेट, पुलगेट, लष्कर व हडपसर भागातील अनेक कालव्यांच्या भिंतीची पूर्णपणे पडझड झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यांची स्थिती अत्यंत दयनीय असून, भविष्यात मोठा अपघात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारच्या घटनेनंतर धरण भागातून पाणी बंद केल्यानंतर कालव्यांमधील निकृष्ट बांधकामाची वस्तुस्थिती समोर आली आहे. नांदेड फाटा कालव्याची भिंत पूर्णपणे खचली असून भिंतीवरील सिमेंटचे प्लॅस्टर निघून गेले आहे. ठिकठिकाणी दगड पडले असून सर्वत्र माती पसरली आहे. भिंतींना मोठी भगदाडे पडली आहेत. सिंहगड रस्त्यावरील लगडमळा येथील कालव्याच्या भिंतीची परिस्थिती गंभीर आहे. सावित्रीबाई फुले वसाहतीतील नागरिकांच्या जिवाला भविष्यात धोक्याला सामोरे जावे लागेल, अशी अवस्था तेथील नाल्यांची आहे. या नाल्यांमध्ये कालव्यातील पाणी येत असल्याने तेथील भिंतीचा भराव खचला आहे. शंकरशेठ रस्ता येथील गोळीबार मैदानाजवळ पाटबंधारे खात्याचे कार्यालय असतानादेखील कालव्याच्या भिंतीची पडझड झाली आहे. अनेक जागी संरक्षक कठडे नाहीत. भिंतीना प्लॅस्टर नसणे, जागोजागी साठलेला कचरा, भिंतीवर दगड व मातीचे ढीग दिसतात.

आम्हालाही
आता भीती वाटते
दांडेकर पुलाजवळील वस्तीमध्ये जी घटना घडली तशी आमच्या भागात होईल की काय, याची भीती वाटू लागली आहे. आमच्या इथून जो नाला वाहतो त्यात कालव्याचे पाणी येते. पाणी थोपविण्यासाठी भिंत बांधण्यात आली होती; मात्र दोन वर्षांपूर्वी सतत पाण्याच्या प्रवाहाने ती भिंत खचली आणि पडली. यामुळे वस्तीतील सहा घरांमध्ये पाणी शिरले. त्यांनी पुढे स्थलांतर केले. दर वेळी पालिकेच्या कर्मचाºयांकडे तक्रार करायची आणि त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे, हा नेहमीचा अनुभव आहे. गुरुवारी दांडेकर पुलाजवळच्या वस्तीमध्ये ज्या पद्धतीने दुर्घटना घडली ती जर आमच्या वसाहतीमध्ये घडली तर त्याला जबाबदार कोण? वेळेवर दुरुस्तीची कामे केल्यास अपघाताचा धोका कमी होईल.
- दीपा आखाडे व सुनीता कांबळे (सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता)

पाहणी केलेले कालवे

नांदेड फाटा कालवा
सिंहगड रस्ता, लगडमळा
आंबेडकरनगर, सिंहगड रस्ता
सावित्रीबाई फुले वसाहत,
सिंहगड रस्ता
डायस प्लॉट
शंकरशेठ रस्ता, गोळीबार मैदान येथील कालवा
पुलगेट येथील कालवा
भैरोबा नाला

गारमाळ येथील आंबेडकरनगर या भागात साधारण ३00 ते ४०० कुटुंबे राहतात. ही कुटुंबे कालव्याच्या कडेलाच आहेत. दोन वर्षांपूर्वी या भागात कालव्याची भिंत खचून अपघात झाला होता. त्या वेळी पाण्याचा मोठा लोंढा घराच्या बाजूने आला. विशेष म्हणजे, पाटबंधारे खात्याकडे तक्रार करून, लेखी निवेदने देऊनदेखील त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. कालव्याच्या भिंतीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. आम्हा नागरिकांच्या जिवाचा धोका टळलेला आहे, असे वाटत नाही. संकट कधीही येऊ शकते. प्रत्यक्षात कालव्यांची स्थिती दयनीय आहे.
- रमेश सूर्यवंशी, गवंडी, गारमाळ

महापालिकेच्या पाणीवाटप लाईनचे काम चालू आहे, असे कारण सांगून धायरी गाव येथील कालव्याजवळ अनेकदा पाण्याची गळती सुरू असते. पालिकेचे कर्मचारी येतात, पाहणी करून निघून जातात; परंतु कालव्यावरील पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. पुलांबरोबर भिंतीची डागडुजी गरजेची असून विसर्जनाच्या वेळी मोठ्या संख्येने भाविकांची या ठिकाणी गर्दी होते. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वर्षानुवर्षे कालव्याच्या भिंतीमधील भराव खचतो आहे.
- लक्ष्मीकांत धनवडे, धायरीगाव

उंदीर, घुशी, खेकड्यांवर जबाबदारी ढकलणाºयांनो ही पाहा वस्तुस्थिती

कालव्यांमधील भिंतींना छिद्रे व त्या खचण्यामागे उंदीर व घुशी आणि खेकड्यांचे कारण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. त्यांच्या या अजब तर्काला काय म्हणावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
कित्येक वर्षांपासून लांबलेली दुरुस्ती, निकृष्ट दर्जाचे बांधकाम यामुळे कालव्याच्या भिंतींना मोठी भगदाडे पडली आहेत. त्यात कालव्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडांची वाढ हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे.

Web Title:  Canal without protection, downstream collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.