मिलिंद एकबोटे यांचा जामीन रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:03 AM2018-05-12T04:03:45+5:302018-05-12T04:03:45+5:30
कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी या दंगलीतील पीडिताने नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी या दंगलीतील पीडिताने नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
समता हिंदू आघाडीचे मुख्य मिलिंद एकबोटे यांच्यावर पुणे पोलिसांनी दोन एफआयआर नोंदविले आहेत. दंगल उसळविण्याचा व प्रिव्हेन्शन आॅफ अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी मार्च महिन्यात अटक केली. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर, एका महिन्यातच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
पुणे सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला या दंगलीतील पीडित संजय भालेराव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, एकबोटे यांच्यावर यापूर्वी १७ केसेस नोंदविण्यात आल्या आहेत आणि ही बाब सत्र न्यायालयाने विचारात घेतलेली नाही. पोलीस तपासानंतर कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित होती, असे सिद्ध झाले आहे.
एकबोटे हे समाजातील प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांची जामिनावर सुटका केली, तर ते पुरावे नष्ट करण्याचा व साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती भालेराव यांनी न्यायालयाला केली आहे.
सुनावणी ५ जूनला : उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीकालीन खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली. मात्र, न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ५ जून रोजी ठेवली.