पुणे : दुचाकीचालकासह दुचाकीला टेंपाेत टाकणारी घटना नुकताच विमाननगर येथे समाेर अाली हाेती. अनेकदा पाेलीसांच्या टाेईंग टेम्पाेमध्ये दुचाकी कशाही पद्धतीने भरल्या जातात. त्यामुळे दुचाकींचे नुकसान हाेत असते. यावर अाता वाहतूक शाखेने उपाय शाेधून काढला असून या टाेईंग टेम्पाेमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात अाले अाहेत. त्यामुळे अाता टेम्पाे कुठल्या भागात अाहे, कशा पद्धतीने वाहने उचलली जात अाहेत यावर लक्ष ठेवणे शक्य हाेणार अाहे.
नाे पार्किंगमध्ये लावण्यात येणाऱ्या दुचाकी उचलून वाहतूक विभागात नेण्यासाठी टेम्पाेचा वापर करण्यात येताे. वाहने उचलण्यासाठी वाहतूक पाेलीसांकडून खासगी कंत्राटदाराला काम दिले जाते. खासगी कंत्राटदार अापले कामगार या टेम्पाेवर नेमताे. या टेम्पाेमध्ये एक वाहतूक पाेलीस सुद्धा असताे. या खासगी कामगारांची वाहचालकांवर करण्यात येणारी अरेरावी गेल्या अनेक प्रकरणांमधून समाेर अाली हाेती. विमाननगरमध्ये तर थेट दुचाकीसह वाहनचालकालाही टेम्पाेत घालण्यात अाले हाेते. यावर माेठी टीका झाल्याने वाहतूक शाखेकडून संबंधित वाहतूक पाेलीसावर कारवाई करण्यात अाली हाेती. अनेकदा वाहन नाे पार्किंगमध्ये हाेते की नाही या व अश्या इतर कारणांवरुन पाेलीस अाणि वाहनचालकांमध्ये खटके उडत असतात. त्यामुळे यावर ताेडगा काढत अाता वाहतूक शाखेकडून या टाेईंग टेम्पाेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात अाले अाहेत. जेणेकरुन या टेम्पाेत दुचाकी कशाप्रकारे भरली जाते, दुचाकींचे नुकसान हाेतेय की नाही याकडे लक्ष देता येणार अाहे. तसेच दुचाकी उचलणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांवरही या सीसीटीव्हीमुळे जरब बसण्यास मदत हाेणार अाहे.
याबाबत बाेलताना वाहतूक शाखेचे उपायुक्त अशाेक माेराळे म्हणाले, नाे पार्किंगमधून दुचाकी उचलण्याबाबत अनेक वाहनचालकांच्या तक्रारी अाल्याने दुचाकी नाे पार्किंगमधून उचलणाऱ्या 4 टेम्पाे व 3 क्रेनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात अाले अाहेत. त्यामुळे नागरिकांच्या दुचाकी उचलण्याबाबत काही तक्रारी असतील तर त्यांचे निरसन करण्यास मदत हाेणार अाहे. तसेच कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवणे शक्य हाेणार अाहे.