‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त आज स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:55 AM2017-12-28T00:55:45+5:302017-12-28T00:56:06+5:30

पुणे : वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने अठरा वर्षे पूर्ण करून एकोणिसाव्या वर्षात पदार्पण केले आहे.

Celebrate the anniversary of 'Lokmat' today | ‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त आज स्नेहमेळावा

‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त आज स्नेहमेळावा

Next

पुणे : वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने अठरा वर्षे पूर्ण करून एकोणिसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. वर्धापनदिनानिमित्त ‘ब्रॅँड पुणे’चा गजर करीत पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासन, उद्योग, व्यापार, जाहिरात आदी क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत वाचकांच्या साथीत गुरुवारी सिंहगड रस्त्यावरील ‘लोकमत’ कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.
वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या ‘लोकमत’ने पुण्यात अनेक उपक्रमांचा श्रीगणेशा करीत ‘लोकमत’ने पुणेकरांच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्या. पुण्याच्या नागरी प्रश्नांना ‘आता बास’, ‘कशासाठी पुण्यासाठी’ यांसारख्या मोहिमांमधून वाचा फोडली. पुण्याच्या विकासासाठी उत्तरे शोधण्यासाठी ‘व्हिजन पुणे’, ‘बिल्डिंग पुणे’ यांसारखे उपक्रम राबविले. समाजातील सर्व घटकांना त्यामध्ये सहभाग घेता यावा, यासाठी ‘मी पत्रकार’ हा अभिनव उपक्रम राबविला. अनेक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’चा गणपती हा उपक्रम तर महिला सन्मानाची चळवळ बनला आहे. यंदाच्या वर्धापनदिनाची ‘लोकमत’ची संकल्पना ‘ब्रॅँड पुणे’ ही आहे. पुण्याचा गौरवशाली वारसा कल्पनांचे पंख लावून नवनिर्मितीसाठी भरारी घेत आहे. एक शहर म्हणून पुणे जगभरात आपली ओळख निर्माण करीत आहे. देदीप्यमान इतिहास, सामाजिक चळवळींनी घडविलेली नवी वाट, शिक्षणाच्या प्रकाशातून ‘आॅक्सफर्ड आॅफ दि ईस्ट’ ही मिळविलेली ओळख, व्यापार-उद्योगांतील कर्तृत्वातून झालेली प्रगती, साहित्य-कला-संस्कृतीच्या जपणूकीतून मिळालेले सांस्कृतिक राजधानीचे बिरुद ते आजचे शांत, सुरक्षित, प्रगतिशील, कॉस्मोपॉलिटन पुणे या सगळ्या प्रवासात सर्वांचाच हातभार लागला आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी ‘ब्रॅँड पुणे’ ही मोहीम ‘लोकमत’च्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. या मेळाव्याला वाचक, लेखक, विक्रेते, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे संपादक विजय बाविस्कर आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे़
।प्रगतीची गरूडभरारी घेत, ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट करीत, समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनाचा पाया मजबूत करीत ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे़ ऋणानुबंधाच्या या गाठी आणखी घट्ट करण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Celebrate the anniversary of 'Lokmat' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.