पुणे : गुलाबी थंडी... लष्करी शिस्त आणि देशभक्तिपर गाण्यांच्या चालींवर लष्करातील अधिकारी आणि जवानांनी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना सोमवारी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे मानवंदना देत ४८ वा विजय दिवस उत्साहात साजरा केला. या वेळी भारतमातेच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना वंदन करण्यासाठी सामान्य नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी (दि. १६) विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून युद्धात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना वाहिली. या प्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, माजी हवाईदल प्रमुख पी. व्ही. नाईक, निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर तसेच १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त अधिकारी आणि जवानांनी पुष्पचक्र वाहून शहिदांना आदरांजली दिली. ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या १३ दिवसांच्या काळात १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध लढले गेले. पाकिस्तानकडून भारताच्या अकरा हवाई अड्ड्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे या युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा भारतीय सैन्यांनी उडवत पाकिस्तानला नमवत पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशची निर्मिती केली. तब्बल ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्र खाली ठेवत भारतीय फौजांपुढे शरण आले. या युद्धात दक्षिण मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जवानांनी देशाच्या सीमारेषांचे रक्षण करण्यासाठी मोठे योगदान दिले. या युद्धात लौंगेवाला येथे झालेल्या लढाईचा विशेष उल्लेख केला जातो. लष्कराच्या अत्युच्च साहस, शौर्य आणि त्यागाचे प्रतीक म्हणून इतिहासात १९७१ च्या युद्धाचा उल्लेख करण्यात आला आहे.
................विद्यार्थ्यांनी गायली देशभक्तीपर गाणी१९७१ च्या युद्धातील जवानांना आदरांजली वाहण्यासाठी पुण्यातीळ विविध केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय युध्द स्मारक येथील मानवंदनेच्या कार्यक्रमात देशभक्तिपर गीते गायली. त्यांना उपस्थित लष्करी अधिका-यांनी प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतूक केले. याच बरोबर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल सैनी यांनी या विद्यार्थ्यांची संवाद साधला.