महाश्रमदानानं साजरा करा महाराष्ट्र दिन: आमीर खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:18 PM2018-04-20T12:18:04+5:302018-04-20T12:18:04+5:30
भविष्यात पानी फाऊंडेशन शहरातील पाणी प्रश्नावर काम करणार
पुणे : आगामी महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे रोजी शहरवासीयांनी मोठ्या संख्येनं जवळच्या खेड्यात जाऊन श्रमदान करावं असं आवाहन अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी पुण्यात बोलताना केलं. यासाठी jal mitra.paanifoundation.in या लिंकवर जाऊन नोंदणी करावी असंही त्यांनी सांगितलं.
पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावं, यासाठीच्या पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आलं. 'महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये एवढी ताकद आहे की, लोक स्वतःहून पाण्याची अडचण सोडवतील. याबद्दल मला विश्वास वाटतो. पुढील पाच वर्षात पानी फाऊंडेशनची गरज वाटू नये,' असं मत आमीरनं व्यक्त केलं. केवळ ग्रामीण भागातील पाणलोट क्षेत्रातील कामावर थांबणार नसून भविष्यात शहरातील पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही आमीरनं सांगितलं.
स्वदेस चित्रपटातून या कामासाठी प्रेरणा मिळाली का, असं विचारले असता, अद्याप स्वदेस पाहिला नसल्याचं उत्तर आमीरनं दिलं. पानी फाऊंडेशनची संकल्पना सत्यमेव जयते या कार्यक्रमातून आली. या कार्यक्रमाचं तिसरं पर्व झाल्यानंतर एका विषयावर सखोल काम करण्याचा विचार होता आणि आम्ही पाणी व महाराष्ट्र या विषयावर संशोधन करून अडचणी समजून कामाला सुरुवात केली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सिम्बॉयसिसचे डॉ. शं. ब. मुजुमदार, विद्या येरवडेकर, संजीवनी मुजुमदार उपस्थित होते.
महाराष्ट्रातल्या 1 कोटी 10 लाख लोकांनी 1 मे रोजी आयोजित केलेल्या महाश्रमदानात सहभागी व्हावं, असा आमचा संकल्प असल्याचं सत्यजित भटकळ यांनी सांगितलं. शहरी आणि ग्रामीण लोकांचं भावनिक नातं निर्माण व्हावं, असाही यामागचा उद्देश असल्याचं भटकळ म्हणाले. महाश्रमदानासाठी किती पैसा खर्च झाला, हा मुद्दा नसून त्यात किती लोक सहभागी झाले, हे महत्त्वाचं असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटलं.