भोर : करंजे (ता. भोर) गावाजवळ नीरादेवघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या भरावावरील दगड चुकविताना सिमेंट काँक्रिटचा मिक्सर ३० फूट खोल कालव्यात पडून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार व दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजता घडली.याबाबत राम किसनराव साळुंके (वय ४४) याने फिर्याद दिली आहे. या अपघातात दलित विष्णू व्यवहारे (वय ३२, रा. कंदार, जि. नांदेड, सध्या रा. निगुडघर, ता. भोर) याचा जागीच मृत्यू झाला. नरसिन्ना कृष्णय्या व सिन्नू वेंकटय्या गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरादेवघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या काँक्रिटचे काम सुरू आहे. हे काम आर. बी. घोडके यांनी घेतले आहे. या कामासाठी लागणारे काँक्रिट नाटंबी येथे मिक्सिंग केले जात आहे. ते मिक्सर (टीएम एमएच २२ एन २८०३) मध्ये भरून आज सकाळी मिक्सर कालव्याच्या कडेने चालक पंढरीनाथ जळवा व्यवहारे (रा. बोरी, ता. कंदार, जि. नांदेड) करंजे गावाच्या पाठीमागील बाजूस काम सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन जात होता. या वेळी कालव्याच्या भरावावर असणारा दगड चुकविण्याच्या प्रयत्नात मिक्सर कालव्याच्या बाजूला जाऊन दोन वेळा उलटून ३० फूट खोल कॅनॉलमध्ये पडला. यावेळी चालकाने उडी मारल्याने तो बचावला, मात्र केबिनमध्ये बसलेले दलित विष्णू व्यवहारे ठार झाले. नरसिन्ना कृष्णय्या व सिन्नू वेंकटय्या गंभीर जखमी झाले आहेत. सुपरवायझर राम साळुंके यांनी जखमींना बाहेर काढून भोर उपजिल्हा रुग्णालयात आणले.दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात काही काळ गोंधळ करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र कंपनीच्या मालकाशी संवाद झाल्यावर हे प्रकरण निवळले.
भोर येथे दगड चुकविण्याच्या प्रयत्नात सिमेंट काँक्रिटचा मिक्सर कालव्यात,एक जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 8:48 PM
करंजे गावाजवळ नीरादेवघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या भरावावरील दगड चुकविताना सिमेंट काँक्रिटचा मिक्सर ३० फूट खोल कालव्यात पडून ही दुर्घटना घडली.
ठळक मुद्देचालकाने उडी मारल्याने तो बचावलामृताच्या नातेवाईकांचा काही काळ गोंधळ करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार