पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (एनएफएआय) जतन केलेल्या देश-विदेशातील दुर्मिळ चित्रपटांच्या लाखो रिळांची विशेष काळजी घेण्यात न आल्याने या रिळांची दुरावस्था, तसेच ’राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशन’ अंतर्गत पावणेदोन वर्षांपासून रखडलेला डिजिटायझेशन आणि रिस्टोअरेशनचा प्रकल्प, कामाच्या आणि खर्चाच्या बाबतीतली अनियमितता या कारणांमुळे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने नेमलेल्या तज्ञांच्या समितीने बुधवारी एनएफएआयला भेट देऊन ‘पाहणी’ केली. या समितीच्या अहवालावरच ५९७ कोटी रूपयांचा प्रकल्प असलेल्या ‘फिल्म हेरिटेज मिशन’ चे भवितव्य ठरणार आहे. 'फिल्म हेरिटेज मिशन' हा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने हाती घेतलेला महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या हेरिटेज मिशनसाठी सुमारे ५९७ कोटींचा भरभक्कम निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात चित्रपटांच्या बरोबरच चित्रपटाशी निगडित पोस्टर, बुकलेट्स, फोटो, करारपत्र, चित्रपट निर्मिती साहित्य) जतन करण्यात येणार आहे. आजमितीला या मिशनसाठी ३० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र हेरिटेज मिशन च्या कामातील अनियमितता आणि देशातील दुर्मिळ रिळांचे योग्यपद्धतीने जतन होत नसल्याची माहिती मिळाल्याने मंत्रालयाने या मिशनचे काम योग्य पद्धतीने होत आहे कि नाही यावर लक्ष्य ठेवण्यासाठी व योग्य त्या सूचना करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयाने ही समिती नेमली. या समितीमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक शाजी करुण, पीयूष शाह, डिजिटल सिनेमाच्या क्षेत्रातील तज्ञ केतन मेहता, 'एनएफएआय'चे माजी संचालक के. एस. शशीधरन आणि चित्रपट जतन तज्ञ पोन्नाया या पाच जणांचा समावेश आहे. ही समिती एनएफएआयमध्ये बुधवारी दाखल झाली . पहिल्या दिवशी समितीने एनएफएआयच्या विधी महाविद्यालय रस्ता फेज 1 आणि कोथरूड फेज 2 ला भेट दिली. चित्रपट रिळांच्या दुरूस्तीच्या कामाचा आढावा समितीकडून घेण्यात आला. रिळांचे जतन करण्यासाठी असलेल्या ‘स्टोरेज वॉल्ट्स’ची पाहणी समितीने केली. एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम आणि प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा यांनी ’फिल्म हेरिटेज मिशन’चे काम किती झाले असल्याची माहिती दिली. ही समिती दोन दिवस संस्थेच्या कारभाराची पाहणी करणार असल्याचे समजते. 'एनएफएआय'तर्फे राबविण्यात येणा-या चित्रपट रिळांच्या दुरुस्तीच्या कामाचा सविस्तर आढावा या समितीकडून घेतला जाणार आहे. आजवर चित्रपट संग्रहालयातून खराब झाल्यामुळे नाहीशा झालेल्या चित्रपटांची यादी बनविणे,नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन प्रकल्प कार्यान्वित ठेवण्यासाठी मार्ग काढणे,'एनएफएआय'मधील चित्रपटांच्या रिळांच्या दुरवस्थेबाबत निरीक्षणे गोळा करून त्यांच्या 'रिस्टोरेशन'च्या उपाययोजना सांगणे, 'एनएफएआय'च्या 'स्टोरेज व्हॉल्ट'चे प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन करणे यावर ही समिती भर देणार आहे.------------------------------------------------------------’ केंद्रीय समिती समोर ‘फिल्म हेरिटेज मिशन’ चे आजवर जे काम झाले आहे, त्याचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली. या समितीच्या अहवालावरच प्रकल्पाचे काम पुढे सुरू ठेवायचे कि नाही हे ठरणार आहे- प्रकाश मगदूम, संचालक एनएफएआय
‘फिल्म हेरिटेज मिशन’च्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती एनएफएआयमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 9:59 PM
'फिल्म हेरिटेज मिशन' हा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने हाती घेतलेला महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या हेरिटेज मिशनसाठी सुमारे ५९७ कोटींचा भरभक्कम निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ठळक मुद्दे चित्रपटांच्या बरोबरच चित्रपटाशी निगडित पोस्टर, बुकलेट्स, फोटो, करारपत्र, चित्रपट निर्मिती साहित्य) जतन करण्यात येणारएनएफएआय'च्या 'स्टोरेज व्हॉल्ट'चे प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन करणे यावर ही समिती भर देणार