पुणे - पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात सोमवारी (6 मे) सकाळी सोनसाखळी चोरट्याच्या टोळीने एकच हैदोस घातला आहे. एका पाठोपाठ घडलेल्या या गुन्ह्यांमुळे पोलीस दल खडबडून जागे झाले असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात येत आहे. चोरट्यांनी सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रामुख्याने लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. वानवडीतील जगताप चौक - ७.३० वाजता, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडे तालीम येथे ७.४५ वाजता व फडके हॉलजवळ ८.४५ वाजता, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठेतील खडी मैदान येथे ८.१० मिनिटांनी, बिबवेवाडीतील रेवती अपार्टमेंटजवळ ८.३० वाजता फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरसीएम कॉलेजजवळ ८.४५ वाजता अशा ६ ठिकाणी ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दानिगे हिसकाविण्यात आले.
गेल्या वर्षी वटपोर्णिमेला सोनसाखळी चोरट्यांच्या एका जोडगळीने संपूर्ण पुणे शहरात काही तासांत १४ ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याचा प्रकार केला होता. त्यानंतर आता एका पाठोपाठ ६ ठिकाणी मंगळसूत्र हिसकाविली गेले आहे. शहराच्या मध्य वस्तीत सकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला. कुमुदिनी शशिकांत ढोंबरे (वय ६५, रा. अॅम्बीयन्स अपार्टमेंट, सदाशिव पेठ) या सकाळी स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी जात होत्या. फडके हॉलसमोर मोटरसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २२ ग्रॅमचे गंठण हिसकावून नेले.
विमल नागनाथ फुलसागर (वय ६७, रा. शनिवार पेठ) या लक्ष्मी रोडवरुन लोखंडे तालीमकडे जात असताना हगवणे चाळीसमोर त्या आल्या असताना मोटरसायकलवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅमचे गंठण हिसकावून नेले. चोरट्यांनी सर्वप्रथम वानवडी येथील जगताप चौकातून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. त्यानंतर ते बिबवेवाडी परिसरात आले. बिबवेवाडी येथील कॅनरा बँकेजवळून एक ज्येष्ठ नागरिक महिला पायी जात होती. तिच्या गळ्यातील २ तोळ्याचे दागिने हिसकावून नेले. या अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्या घाबरुन घरी गेल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याचा माहिती दिली.
समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडीचे मैदान येथे त्यानंतर ८३ वर्षाच्या नलिनी उनवणे यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांचे दागिने हिसकावून नेले. सुमारे एक तासांमध्ये चोरट्यांनी सहा ठिकाणी महिलांचे दागिने लुटले. मात्र, या घटनांची माहिती पोलिसांना उशिरा समजली. जेव्हा समजली तोपर्यंत चोरटे आपले काम करुन पसार झाले होते. शहरात सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आली असून सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जात आहे.