Chakan: आंबेठाण बाह्यवळणला अखेर मुहूर्त, एमआयडीसी भागातील वाहतूक लागणार मार्गी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 04:41 PM2023-07-22T16:41:31+5:302023-07-22T16:42:07+5:30
रखडलेल्या कामाबाबत दैनिक लोकमतने स्थानिक नागरिक आणि प्रवाशी यांना होणाऱ्या त्रासाबाबत पाठपुरावा करीत याबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते...
आंबेठाण (पुणे) :चाकण-तळेगाव रस्ता आणि चाकण शहर येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असलेल्या आंबेठाण (ता.खेड) येथील बाह्यवळण रस्त्याचे काम अखेर सुरू झाले आहे. यामुळे औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. रखडलेल्या कामाबाबत दैनिक लोकमतने स्थानिक नागरिक आणि प्रवाशी यांना होणाऱ्या त्रासाबाबत पाठपुरावा करीत याबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते.
चाकण-वासुली फाटा या मार्गावरील वाढती वाहतूक सुरळीत करण्यासाठी आंबेठाण गावच्या उत्तर बाजूने बाह्यवळण रस्ता करण्यात आला आहे. सुरुवातीला जागा संपादन प्रश्न असल्याने हे काम रखडले होते. तो प्रश्न मार्गी लागल्यानंतर वीज वितरण कंपनी संबंधित प्रश्न उभा राहिल्याने हे काम रखडले होते.
चाकण ते करंजविहीरे या मार्गाने काम हायब्रीड अँन्युटीअंतर्गत करण्यात आले. हा संपूर्ण रस्ता रुंदीकरण आणि नुतनीकरण करण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटली असून चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. परंतु आंबेठाण बाह्यवळण रखडल्याने या साऱ्या कामावर पाणी फेरले जात होते. जवळपास २०० मीटरचे बाह्यवळण असून १०० मीटरचे पूर्ण झाले होते तर उर्वरित १०० मीटर काम रखडले होते. या १०० मीटर मध्ये प्रचंड मोठे खड्डे आणि धूळ असल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.नव्या रस्त्याने प्रवासाचा वाचलेला वेळ या ठिकाणी वाया जात आहे.
बाह्यवळणसाठी संपादित जागा -
१) कुलकर्णी परिवार - ८६१ चौ. मीटर
२) सोनवणे परिवार - ४५ चौ. मीटर
३) दवणे परिवार - २२६ चौ. मीटर
एकूण संपादित जागा - ११३२ चौ. मीटर पैकी कुलकर्णी आणि सोनवणे परिवार यांना भूसंपादन मोबदला वितरित करण्यात आला असून दवणे परिवाराला मोबदला देण्याची प्रक्रिया जवळपास मार्गी लागली आहे. परंतु रस्ता कामाला अडथळा नाही.
भूसंपादनासाठी निधी -
शासनाच्या बजेट मधून १ कोटी २५ लाख.
अचानक काम सुरू केल्याने एमआयडीसीत जाणाऱ्या वाहनचालकांची रस्ता बंद असल्याने चांगलीच तारांबळ उडाली होती. अनेकांना रस्त्याची माहिती नसल्याने मिळेल त्या मार्गाने वाहने पळवल्याने आंबेठाण आणि महाळुंगे येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.