दाट धुक्याची शक्यता, वाहनचालकांसाठी सावधानतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:29 AM2020-12-15T04:29:33+5:302020-12-15T04:29:33+5:30

पुणे : संपूर्ण ढगाळ वातावरण, झोंबणारे थंडगार वारे आणि मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी अशा परिस्थितीत पुणेकरांना आज ‘हिल स्टेशन’सारखे ...

Chance of thick fog, warning for motorists | दाट धुक्याची शक्यता, वाहनचालकांसाठी सावधानतेचा इशारा

दाट धुक्याची शक्यता, वाहनचालकांसाठी सावधानतेचा इशारा

Next

पुणे : संपूर्ण ढगाळ वातावरण, झोंबणारे थंडगार वारे आणि मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी अशा परिस्थितीत पुणेकरांना आज ‘हिल स्टेशन’सारखे वातावरण अनुभवायला मिळाले. सोमवारी (दि. १४) रात्री व मंगळवारी पहाटे शहर व जिल्ह्यात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दृश्यमानता अतिशय कमी होणार असून वाहनचालकांसाठी हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

दृश्यमानता कमी असल्याने शहरातील रस्त्यांवर, महामार्गावरुन वेगाने जाताना अपघात होण्याची भीती आहे. यामुळे वाहनांची गती कमी ठेवावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

शहरात आज सकाळपासूनच दाट धुके, ढगाळ हवामान आणि अधूनमधून येणारा पाऊस असे वातावरण दिसून येत होते. दिवसाच्या तापमानात मोठी घट झाल्याने पावसाबरोबरच थंडीही जाणवत होती. रविवारी कमाल तापमान २७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यात सोमवारी आणखी घट होऊन ते २३.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने कमी आहे. त्याचवेळी रात्रीच्या तापमानात वाढ झाली असून सोमवारी सकाळी किमान तापमान १७.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. ते सरासरीपेक्षा ६.५ अंश सेल्सिअसने अधिक आहे.

शहरात आज दिवसभर पावसाळी वातावरण होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अधून मधून पावसाची एखादी सर जोरात येत होती. दुपारपर्यंत अधूनमधून पाऊस पडत होता. दुपारनंतर सूर्यदर्शन झाले तरी आकाशात पुन्हा ढगांची गर्दी होत होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ५ मिमी तर लोहगाव येथे २ मिमी पावसाची नोंद झाली.

शहरात मंगळवारी आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Chance of thick fog, warning for motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.