गणितातले बदल मराठीला मारक असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 07:00 AM2019-06-19T07:00:00+5:302019-06-19T07:00:04+5:30
मराठीचे इंग्रजीकरण, मराठी अप्रिय करण्याचा घाट घालत करण्यात आलेला हा बदल मराठी भाषेची तोडफोड करणारा आहे.
पुणे : विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती कमी व्हावी, यासाठी बालभारतीच्या दुसरी इयत्तेच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनात काही बदल सुचवण्यात आले आहेत. मराठीचे इंग्रजीकरण, मराठी अप्रिय करण्याचा घाट घालत करण्यात आलेला हा बदल मराठी भाषेची तोडफोड करणारा आहे, अशी तक्रार साहित्य वर्तुळातून केली जात आहे. गणिताच्या पुस्तकातील बदलाला साहित्यिकांचा विरोध का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गणिताच्या पुस्तकात २१ ते ९९ या संख्यांचे वाचन व शब्दात लेखन यात बदल केला आहे. सत्त्याण्णवऐवजी नव्वद सात असे शिकवावे, असे सुचवण्यात आले आहे. शासनाने हा बदल थांबवावा, यासाठी निवेदन देण्याची भूमिकाही जाहीर केली आहे. मात्र, भाषेची कोणत्याही प्रकारे तोडफोड होणार नसून, टीका करण्यापेक्षा बदल समजून घ्यावेत, असे आवाहन गणितज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले, ‘मराठीचे इंग्रजीकरण करत, जोडाक्षरे कठीण असल्याच्या आणि सोपेपणाच्या नावाखाली मराठीच नष्ट करण्यासाठी हे सारे पुढे रोमन लिपीत मराठी लिहिणे देवनागरीपेक्षा अधिक सोपे आहे, असे म्हणण्याकडे चालले आहे. मराठी भाषेची सर्वमान्य रूढ झालेली लिपी, शब्दसंपदा, रूप, स्वरूप, संचित, परंपरा व संस्कृती संपण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे. मराठी अप्रिय करण्याचे व इंग्रजी पद्धतच सोपी असल्याचे ठसवण्यासाठी हे इंग्रजी लॉबीचे कारस्थान दिसते आहे. हे त्वरित थांबवण्यासाठी शासनाला निवेदन पाठवण्याची गरज आहे.’ नवीन पध्दतीनुसार, मराठीमध्ये संदिग्धता निर्माण होत असल्याचे आणि धोरणे लादली जात असल्याचेही साहित्यिकांचे म्हणणे आहे. एकदा देवनागरी लिपी कठीण व रोमन सोपी आहे म्हणून तिचाही स्वीकार मराठी समाज करणार असेल तर रोखणारे आपण कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
‘मराठी काका’ अशी ओळख असलेल्या अनिल गोरे स्वत: गणिततज्ज्ञही आहेत. ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या शिकवण्या घेतात. त्यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मराठी संख्यावाचन निर्णयाची कोणती व्यापक चर्चा झाली, ती कोणत्या पातळीवर झाली, या चर्चेत शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण खात्यातील अधिकारी सहभागी होते याची माहिती प्रसिद्ध झालेली नाही. संख्या वाचनातील ही नवी पद्धत थेट पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून जाहीर करण्यात आली आहे. जोडाक्षरे उच्चारणे विद्यार्थ्यांना जमत नाही, हे या बदलासाठी दिलेले कारण फारच तकलादू आहे आणि समर्पक नाही. महाराष्ट्र शासनाने पुढील मुद्यांचा विचार करून सदर नवी पद्धत तातडीने मागे घ्यावी अशी मागणी संबंधित शासकीय यंत्रणेकडे केल्याचे गोरे यांनी म्हटले आहे.
------
पाठ्यपुस्तक मंडळाच्या दोन्हीपैकी एक निवडा या भूमिकेस विरोध आहे. शिकताना सत्तर तीन त्र्याहत्तर चालेल. पण, संख्या त्र्याहत्तरच म्हणावी. ग्रामीण भागात शाळेत न गेलेल्या महिलांना सुध्दा शंभरपर्यंत आकडे येतात. उत्तर भारतात ळ नाही. आपण ळ रद्द करायचा का? ज्ञानेश्वरांची, नामदेवांची, तुकोबांची मराठी संपवू नका. सुप्रिम कोर्टाने दहावीपर्यंत मराठी सक्तीची करण्यास परवानगी दिली आहे. अमराठी लोकासाठी सोपा अभ्यासक्रम तयार करा. तो संवादात्मक असावा. नव्वद टक्के मराठी मुलांना सरकारी नोक-या मिळणार नाहीत.स्वबळावर जगण्याचे सामर्थ्य मातृभाषा देते. दुर्देवाने मराठी ‘विनोदाच्या तावडीत’ सापडली होती. आता आशिष शेलारांना सद्बुध्दी लाभो.