इंदापूरात 'दाेनशे कोटी' भिशी घोटाळ्याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 01:04 PM2022-01-21T13:04:43+5:302022-01-21T13:05:05+5:30
संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर, गुरुवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला
बाभूळगाव : उरुळी कांचन येथील भिशी प्रकरणानंतर आता इंदापूरमध्येही २०० कोटींचा भिशी घोटाळा उघडकीस आला आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर, गुरुवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार तब्बल १६ भिशीचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सध्या दोन - तीन तक्रारदार आहे. पण ही संख्या वाढण्याची शक्यात वर्तवण्यात येत असून, पोलिसांनी गुप्तता पाळल्याने शहरात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.
इंदापूर तालुक्यातील व्यापारी, शेतकरी, मजूर, नोकरदार यांनी बेकायदेशीर भिशीमध्ये गुंतवणूक केली आहे. सुमारे १८ अवैध भिशीचालकांनी इंदापूर शहरासह तालुक्यातील गुंतवणूकदारांची फसवणूक करीत दोनशे कोटींची माया जमविल्याची चर्चा आहे. अवैध भिशीचालकांनी गुंतवणूकदारांचे पैसे माघारी देण्यास नकार दिल्याने गुंतवणूकदारांनी प्रशासनाकडे धाव घेत बुधवारी (दि. १९) तक्रार अर्ज दिला. या तक्रारीनंतर अवैध भिशीचा घोटाळा उघडकीस आला. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, मंत्रालयातून सूत्रे हलल्याने थेट पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी चार पथके इंदापूरला रवाना केली आणि त्यानंतर हालचाली सुरू झाल्याची चर्चा इंदापूरमध्ये होती. पोलिसांनी अनेकांचे जबाब नाेंदवल्यानंतर गुरुवारी पहाटे सुमारे १६ भिशीचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तसचे पोलीस अधीक्षकांनी पाठवलेल्या चार पथकांनी संयुक्त तपास करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या गुन्ह्याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळली आहे.
मागील काही महिन्यांपासून इंदापूरसह तालुक्यामध्ये अवैध भिशी, तसेच खासगी सावकारीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. गुरुवारी (दि. २०) देखील इंदापूर शहरातील रहिवासी तरुण विशाल गवळी याने खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. अवैध धंद्यांनी इंदापूरच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आणलाच, पण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची नागरिकांतून चर्चा सुरू आहे.
आणखी चार-पाच आरोपी वाढण्याची शक्यता
२०० कोटींच्या भिशी घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. आतापर्यंत १६ जणांवर गुन्हा दाखल केला असून, यामध्ये आणखी चार ते पाच आरोपी वाढणार आहे. या घोटाळ्याची माहिती समजू लागल्याने तक्रारदारही वाढले जाऊ लागले आहे. साधारण दीडशेच्या आसपास तक्रारदारांची संख्या होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.