छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:28 AM2019-03-07T01:28:23+5:302019-03-07T01:28:27+5:30
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कात्रजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कात्रज : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कात्रजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी स्व:खर्चातून छत्रपती संभाजीमहाराज यांचा सुमारे ८५० किलोंचा, ८ फूट पूर्णाकृती पुतळा नानासाहेब पेशवे तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ बसविला आहे.
कात्रज तलावावर छत्रपती शिवाजीमहाराजांबरोबरच छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा बसविल्यामुळे येथील वैभवात भर पडली आहे. या कार्यक्रमाला माजी नगसेवक सुरेश कदम, नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे, नमेश बाबर, राहुल पोकळे, प्रभाकर कदम, राजाभाऊ कदम, योगेश शेलार, संतोष धुमाळ आदींसह शिवशंभू प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे बसविण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासाठी मनपात प्रभाग ३८ व ४० प्रभागातील आठ नगरसेवकांच्या सह्यांनी प्रस्ताव दाखल करत, मुख्य सभेत मान्यता घेण्यात आली होती.
कात्रज येथील किनारा हॉटेल ते तलाव अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. जय शिवाजी, जय भवानी.., छत्रपती संभाजीमहाराज की जय..! अशी घोषणा, फटाक्यांच्या आतषबाजीत कात्रज तलावावर मोठ्या दिमाखात स्वागत झाले.
शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम, शिवाजी जेधे, नवनाथ पवार, स्वप्निल लिपाणे, नीलेश खामकर, सागर घाडगे आदींसह कार्यकर्त्यांनी पुतळा उभारण्यासाठी परिश्रम घेतले.