‘छत्रपती’च्या तत्कालीन २२ संचालकांवर ठपका
By admin | Published: November 15, 2016 03:40 AM2016-11-15T03:40:28+5:302016-11-15T03:40:28+5:30
भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती साखर कारखान्याच्या कलम ८८ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीमध्ये साखरविक्रीबाबत तत्कालीन २२ संचालकांवर ठपका
बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती साखर कारखान्याच्या कलम ८८ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीमध्ये साखरविक्रीबाबत तत्कालीन २२ संचालकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी २२ संचालकांकडून कारखान्याच्या आर्थिक नुकसानापोटी ६ कोटी ९२ लाख ९३ हजार ११० रुपये वसूल करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकारी डी. आर. घोडे यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक संचालकावर ३१ लाख ५० हजार रुपये वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या आदेशामुळे तत्कालीन संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१० या कालावधीत साखरविक्रीमध्ये कोणताही गैरव्यवहार केला नाही, तसेच १७ जून २०११ रोजी ठराव करून न उचललेल्या साखरेची फेरविक्री करण्यातही काही गैर केलेले नाही. मात्र, संचालक मंडळातील मतभेद आणि संघर्षामुळे साखरविक्री करण्यास तसेच व्यापाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली नाही. त्यासाठी संबंधित संचालकांची उदासीनता आणि निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यासाठी संबंधित संचालकांना जबाबदार धरण्यात येत आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०१० या कालावधीत साखरविक्रीचा निर्णय होऊनदेखील प्रत्यक्ष साखर उचल झाली नाही. जुलै आणि आॅगस्ट २०११मध्ये फेरनिविदा काढून मूळ विक्री दरापेक्षा कमी दराने विक्री करण्यात आली. एकूण ८३ हजार ४४ पोती साखरविक्रीतून पूर्वीच्या दराने २५ कोटी ५ लाख ८९ हजार ८२३ रुपये रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष २० कोटी ९९ लाख ५८ हजार ९९८ रुपये मिळाले. त्यामुळे ४ कोटी ६ लाख ३० हजार ८२५ रुपये नुकसान झाले. शिवाय विक्री निर्णयानंतरदेखील उचल न झाल्याने साखर तात्पुरत्या गोडाउनमध्ये ठेवावी लागली. त्यासाठी १८ लाख ५५ हजार १७४ रुपये खर्च झाला. तसेच, कारखान्याच्या कॅश के्रडिट कर्जाच्या दरानुसार २ कोटी ५८ लाख ८५ हजार २८५चेदेखील नुकसान झाले. अबकारी कराची रक्कम व्यापाऱ्यांकडून वसूल झालेली नसताना ती रक्कम कारखान्याने स्वनिधीतून भरणा केली.