येरवडा : दीडशेहून सीसीटीव्ही फुटेज चेक करत विश्रांतवाडी पोलिसांनी दोघा सराईत सोनसाखळी चोरांना जेरबंद केले. चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराला देखील या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अशोक नामदेव गंगावणे (वय 31) व अनिल रघुनाथ बिरदवडे (वय 32 दोघेही रा. बांदलवाडी, बारामती ) या दोन सोनसाखळीचोरांसह गुन्ह्यातील सोने खरेदी करणारा सोनार आकाश महादेव सोनार (वय 35 रा. बारामती) याला देखील अटक करण्यात आलेली आहे.
विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबरला विश्रांतवाडी कळस येथील विशाल परिसर या ठिकाणी हबिबा शेख (वय ५१) या घराच्या बाहेरील बाकावर बसलेले होते. तेव्हा काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन अज्ञात इसमांनी येऊन त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे जबरदस्तीने हिसका मारून तोडून कळस गावठाणच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रफुल मोरे, शेखर खराडे ,संदीप देवकते यांनी कळस येथून बारामती पर्यंत अंदाजे दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केल्यानंतर या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध लागला.
सदरचे आरोपी बारामती येथील २९ फाटा याठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस हवालदार दिपक चव्हाण व शिपाई संदिप देवकाते यांना गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी सापळा रचून त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतले. अधिक तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दाखल गुन्ह्यात दोन सोनसाखळीचोरांना सह चोरीचे सोने विकत घेणारा सोनार यांना देखील अटक करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील तीन तोळे वजनाचे सोनसाखळी हस्तगत करण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले.