शेलपिंपळगाव : मरकळ (ता. खेड) गावच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतींमधील सहा ते सात खाजगी कंपन्यांमधून केमिकलयुक्त तसेच विषारी धूर हवेत सोडला जात आहे. विशेष म्हणजे खुलेआम हवेत सोडल्या जाणाऱ्या धुरावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. परिणामी विषारी धुरामुळे गावातील तसेच कंपनी लगतच्या स्थानिक रहिवाशांचे तसेच पाळीव प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित सर्व खाजगी कंपन्यांनी तात्काळ उपाययोजना करून विषारी धुराचा प्रश्न मार्गी लावावा; अन्यथा 'त्या' सर्व कंपन्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
आळंदीलगत असलेल्या मरकळ ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक वसाहतींचे मोठे जाळे पसरले आहे. गावच्या पूर्वेकडील बाजूला बहुतांशी मोठं - मोठे कारखाने विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करत आहे. मात्र यामधील संत ज्ञानेश्वर स्टील, सोहम स्टील, श्री. स्टील, रामानंद एक्सकलूजम प्रा. लि. कंपनी, के के पॉवर, गॅलकॉन इंडिया, क्लोराईड मेटल्स आदी खाजगी कंपन्यांमधून निघणारा विषारी धुर बिनदिक्कतपणे हवेत सोडला जात आहे.
परिणामी, हा विषारी धूर हवेद्वारे वातावरणात पसरला जाऊन गावातील नाणेकरवस्ती, पाटीलवस्ती, वर्पेवस्ती तसेच गावाला प्रदूषित करत आहे. या धुरामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडू लागले आहेत. तसेच अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. केमिकलयुक्त धुराच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील पिकांच्या उत्पादनावरही परिणाम झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याविरोधात नाणेकरवस्ती, पाटीलवस्ती तसेच वर्पेवस्तीवरील रहिवाशांनी संबंधित कंपन्यांविरोधात ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
या पार्श्वभूमीवर सरपंच भानुदास लोखंडे, उपसरपंच संतोष भुसे आदींनी शनिवारी (दि.२२) संबंधित सर्व कंपन्यांची पाहणी करून 'त्या' कंपन्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. संबंधित कंपन्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही उपाय योजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
आधीच कोरोना संसर्गाने हैराण झालेल्या मरकळकरांना आता खाजगी कंपन्यांमधून निघणाऱ्या विषारी धुराचा सामना करावा लागत आहे. केमिकलयुक्त धूर असल्याने त्याचा उग्र वास येत असून डोळ्यात पाणी येत आहे. परिणामी नागरिकांना श्वसनाचा त्रास उद्भवू लागला आहे. काही कंपन्यां धुरावर प्रक्रिया केल्याचे सांगत आहेत. मात्र हे खोटे बहाणे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.