पुणे : कायद्यासमोर सर्व समान असून माजी मंत्री छगन भुजबळ यांची चौकशीची प्रक्रिया संपलेली आहे. त्यामुळे कायद्यानुसार भुजबळ यांना जामीन मिळाला पाहिजे.परंतु,काही कारणास्तव जामीन देता येत नसेल तर तत्काळ न्यायालयात खटला सुरू करून संबंधित व्यक्ती दोषी किंवा निर्दोष आहे,याबाबत निर्णय देणे अपेक्षित आहे. दोषी असल्यास तुरूंगात ठेवले तर त्यावर कोणीही आक्षेप घेणार नाही. त्यामुळे कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार भुजबळ यांना जामीन मिळायला हवा,अशी भूमिका भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी स्पष्ट केली.धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.या प्रसंगी धनगर समाजाचे नेते माजी आमदार विजय मोरे,हरीभाऊ बधे, अर्जुन सलगर,इंद्रकुमार भिसे,अशोक माने, मारूती जामकर आदी उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, न्याय मिळण्यापासून वंचित ठेवलेल्या समाज अस्वस्थ आहे. त्यात छगन भुजबळ यांना न्याय मिळायला हवा,यासाठी माळी समाजाचे अनेक नेत्यांनी माझी भेट घेतली.कायद्याने भुजबळ यांना दिलेले स्वातंत्र्य नाकारता येत नाही.त्यातच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी)वकिलांनी न्यायालयात आमची चौकशी संपली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ज्या कारणास्तव भुजबळांना यांना ताब्यात घेण्यात आले होते. ती प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळायला हवा. चौकशीची प्रक्रिया संपल्यानंतर कोणलाही विनाकारण तुरूंगात ठेवता येत नाही. तसेच न्यायालयीन सुनावणी सुरू असताना प्रत्येकाला जामीन मिळण्याचा अधिकार आहे.दरम्यान,धनगर समाजाला आरक्षण देण्याबरोबरच त्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारीप बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १०० जागांवर धनगर समाजाचे प्रतिनिधी निवडणूक लढणार आहेत, असे धनगर समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच भारतीय जनता पक्ष,शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केवळ खोटी आश्वासने दिली.त्यामुळे न्यायापासून वंचित ठेवलेल्या घटकांना बरोबर घेवून निवडणूक लढणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.------------------------------राज्यात तिस-या आघाडीच्या मोट बांधणीला सुरूवात राज्यातील सर्वच पक्षांनी धनगर व आदिवासी समाजात वाद निर्माण केला.धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक वर्षे धनगर समाजाची सत्ताधारी पक्षांच्या मागे फरफट झाली.त्यामुळे तिसरी आघाडी उभारून विधानसभा निवडणूक लढली जाणार आहे. येत्या २० मे रोजी पंढरपूर येथे धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
छगन भुजबळांना त्वरीत जामीन मिळायला हवा : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 5:10 PM
प्रकृती अस्वस्थ असलेल्या व्यक्तीला निष्कारण चौकशीच्या नावाखाली तुरुंगात ठेवणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. हाच न्याय राष्ट्रवादी कौंग्रेसचे माजी नेते छगन भुजबळ यांनाही लागू होतो.
ठळक मुद्देधनगर समाजाला भारिप महासंघाचा पाठिंबा धनगर व ओबीसी समाजासह दुखावलेल्या सर्व समाजाला सोबत घेऊन निवडणुका लढविण्याचे संकेत राज्यात तिस-या आघाडीच्या मोट बांधणीला सुरूवात