मराठा आरक्षण प्रश्नावर आज दोन महत्वाच्या नेत्यांची पुण्यात भेट होते आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे हे दोघं आज पुण्यात भेटून या प्रश्नावर चर्चा करणार आहेत.
छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्नावर आक्रमक झाले आहेत.संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मागणीसाठी मूक आंदोलनाची घोषणा केली आहे .राज्यातल्या अनेक लोकांच्या भेटी संभाजीराजे घेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोपर्डी चा दौरा देखील केला होता. त्यापूर्वीच या प्रकरणी चर्चा करण्यासाठी उदयनराजे आणि संभाजीराजे यांची भेट होणार होती. मात्र काही कारणाने ही भेट पुढे गेली होती.आ
अखेर आज या दोन्ही नेत्यांची पुण्यात भेट होणार आहे. दुपारी 1 वाजता हे दोघे भेटणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा नेमकी कशी असावी याबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.या भेटीनंतर दोघे समाजाला आंदोलनाचा पुढचा दिशेबाबत मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. छत्रपती संभाजीराजे गेल्या काही दिवसांपासून भाजप पासून दूर जात असल्याची चर्चा आहे. अनेक भाजप नेत्यांनी त्यांचावर उघडपणे टीका केली आहे. दुसरीकडे उदयनराजे हे भाजपचे खासदार आहेत. सुरुवाती पासून मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनात सक्रिय असणारे उदयनराजे आता नव्या आंदोलनात संभाजीराजांची साथ देणार की स्वतःची वेगळी भूमिका घेणार हे पाहावं लागेल.