लोहगावचे छत्रपती शिवरायांचे संग्रहालय
By admin | Published: September 13, 2016 01:19 AM2016-09-13T01:19:49+5:302016-09-13T01:19:49+5:30
सुटीचा दिवस आहे. कुठे तरी फिरायला जाण्याच्या विचारात आहात..? कमी वेळेत फिरून येता येईल, असे ठिकाण शोधताय तर तुमच्यासाठी लोहगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज संग्रहालय
श्रीकांत बोरावके, आळंदी
सुटीचा दिवस आहे. कुठे तरी फिरायला जाण्याच्या विचारात आहात..? कमी वेळेत फिरून येता येईल, असे ठिकाण शोधताय तर तुमच्यासाठी लोहगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज संग्रहालय एक उत्तम ठिकाण ठरू शकते.
लोहगाव येथे छत्रपती शिवाजीमहाराज संग्रहालय आहे. छावणीच्या आकारातील शेड उभारत हे संग्रहालय सजवले असून प्रवेश करताच पहिल्या छावणीतील भवानीमातेची व छत्रपती शिवाजीराजांची शिल्पाकृती काही काळ आपल्याला मोहीत करून जाते. त्याच छावणीत शिवाजीराजांची पितळ धातूची अर्धाकृती मुखवटा प्रतिकृती असून, तीही पाहण्यासारखी आहे. शिवकालापासून ते सध्याच्या काश्मीर प्रश्न, गोध्रा हत्याकांड अशा विविध ऐतिहासिक व घटनांचा आढावा तैलचित्रे व फलकांच्या माध्यमातून इथे घेण्यात आला आहे. विशेषत: छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनकार्य व घटनांवर आधारित चित्रांचे प्रदर्शन पाहण्यासारखे आहे. चार ते पाच छावण्या उभारून त्यात हे चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. अहल्याबाई होळकर यांचाही जीवनपट उत्तमरीत्या तैलचित्रातून साकारला असून, त्यातून त्यांच्या कार्याला न्याय द्यायला चित्रकार यशस्वी ठरला आहे. बादशहा शहाजहानच्या मृत्यूचे लिखित पत्रांवरून साकारलेले काल्पनिक छायाचित्र, मोडी लिपीतील पत्रव्यवहार, काश्मिरी पंडितांचा प्रश्न, गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर टाकलेला प्रकाश, भारतातील धर्मांची प्रगती व ऱ्हास यावरील माहितीफलकांच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश ज्ञानात भर पाडणारा आहे. येथील नैसर्गिक परिसरही सुंदर असून, संग्रहालयाच्या मध्यभागी असलेले तळे व त्यावर उभारलेला लाकडी पूल संग्रहालयाच्या सौंदर्यात अधिकच भर पाडत आहे. हे संग्रहालय आठवड्याचे सातही दिवस खुले असून सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत भेट देणाऱ्यांसाठी ते खुले असते. शाळा, महाविद्यालयाबरोबरच पर्यटकही मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देत असून, एक दिवसाची छोटी सहल या ठिकाणी आयोजित करता येऊ शकते. आळंदी, तुळापूरपासून जवळच असल्याने भाविकही या छोट्या पण आकर्षक संग्रहालयाला भेट देताना दिसून येतात.