जुन्नर : जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचा शासन निर्णय झाला असून दोन दिवसात याबाबत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकाराशी बोलत होते.
शिवजन्मस्थळात पारंपरिक पद्धतीने पाळणा हालवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावळ, आमदार आशिष शेलार, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, जी.प.अध्यक्ष विश्वास देवकाते, आमदार शरद सोनवणे, पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण , शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे कार्यवाह रविंद्र काजळे , नरेंद्र तांबोळी , विभागीय आयुक्त चंदकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस महापरिक्षेत्र आधिकारी आधिकारी विश्वास नांगरे, तहसीलदार किरण काकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला.
शिवकुंज स्मारकातील बालशिवबा व राजमाता जिजाऊ यांच्या शिल्पास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी अभिवादन केले. शिवजन्मस्थळापासून शिवकुंज स्मारकपर्यंत बालशिवबाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवरायांना पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. मुंबई येथे कार्यक्रम असल्याने कोणतेही भाषण न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावळ यांनी लगेचच मुंबईला प्रयाण केले.
प्रवेश पास काढण्याच्या सक्तीने नाराजीमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणासाठी शिवनेरीवर येणाºया शिवभक्तांना आगाऊ प्रवेशाचे पास काढण्याच्या पोलिसांच्या सक्तीने शिवप्रेमीमध्ये मोठी नाराजी वयक्त करण्यात येत होती. प्रवेशपास नसलेले हजारो शिवप्रेमी किल्याच्या पायथ्याशी खोळंबून बसले होते. मुख्यमंत्री व मान्यवरांचे गडावरून प्रस्थान झाल्यानंतर राज्यातून आलेल्या शिवप्रेमींनी गडावर सोडण्यात आले. त्यानंतर मात्र गडावर मोठी गर्दी ऊसळली.