पुणे : आवड असलेली गोष्ट मिळण्याची जिद्द असेल तर कोणतेही ध्येय अवघड नाही. हे वाक्य जणू मनात बिंबवून जन्मता अंध असतानाही ओमकारने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. पोहण्याच्या स्पर्धेत सिंगल स्ट्रोक फ्री स्टाईलमध्ये देशपातळीवर एक रौप्य व एक कांस्यपदक पटकावले आहे. तसेच तो विविध प्रकारचे पारंपरिक आणि वेस्टर्न वाद्य वाजविण्यातही तरबेज आहे.
बालपणीच ओमकारची दृष्टी नियतीने हिरावून घेतली. ओमकारला आदित्य नावाचा जुळा भाऊ देखील आहे. पाच वर्षांचा असताना त्यांच्या कुुटुंबाचा अपघात झाला होता. त्यात आईचा मृत्यू झाला. आईचे अचानक निधन झाल्यामुळे दोन्ही मुलांची पूर्ण जबाबदारी वडील समीर तळवळकर यांच्यावर आली. सध्या तो एरंडवण्यातील शिशू विहार शाळेत पाचवीत शिकत आहे. ओमकारला लहानपणापासून पोहण्याचे आकर्षण होते. गेली दोन वर्षे त्याने पोहोण्याच्या स्पर्धेत सिंगल स्ट्रोक फ्री स्टाईल आणि बॅक स्ट्रोकमध्ये राज्य पातळीवर एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले. तर देशपातळीवर देखील पदके मिळवली आहेत. पुढील नॅशनल पॅरा स्वीमिंग स्पर्धेसाठीदेखील त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. केवळ पोहण्याचीच नाही तर चेस, मल्लखांब, तायक्वांदोमध्ये देखील त्याला रस आहे. देशातील सर्वात तरुण अंध चेसपटू असे टायटल त्याला मिळाले आहे. लायन्स क्लॅब आयोजित बावधान येथे झालेल्या जिल्हास्तरीय विकलांग स्पर्धेत तो दुसरा आला होता.
खेळांबरोबर ओमकारला संगीताचीदेखील आवड आहे. तो तबला, पखवाज, सतार, हार्मोनियम, ड्रम, गिटार, पियानो देखील वाजवतो. शाळेबरोबर प्रत्येक बाबीला वेळ देता यावे म्हणून त्याचे आठवड्याचे नियोजन केले आहे. रेटीना निकामा झाला म्हणून नैराश्येचा अंधार मात्र त्याने पसरू दिला नाही. मनावरचा उजेड तसूभरही ढळू दिला नाही. शिकणेही अगदी चारचौघांसारखेच सुरू ठेवले. त्यामुळे तो त्याच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरला आहे, यातच मोठा आनंद असल्याचे तळवळकर यांनी सांगितले.आधी मी शिकलो..ओमकारबरोबर कसे वागायचे हे सुरुवातीला मला काही कळेना. त्यामुळे त्याबरोबर कसा संवाद साधायचा याबाबत मी मुंबईत पॅरा मेडिकल कोर्स केला. दैनंदिन काम, शिक्षण, त्याच्या गरजा काय असतात या बाबी मी कोर्समध्ये शिकलो. अपघातातून सावरायला मला दीड वर्ष गेले, अशी माहिती तळवळकर यांनी दिली.