लोकमत न्यूज नेटवर्क
सुपे : ‘‘येथील विद्या प्रतिष्ठान स्कूलतर्फे राबविण्यात आलेला ‘एक मूल, एक झाड आणि एक टँकर’ ही संकल्पना राज्यातील सर्व शाळांनी राबवली तर सामाजिक वनीकरण कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर पुनश्च उभारी घेऊ शकते,’’ असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण परिमंडल अधिकारी ए. बी. पाचपुते यांनी केले.
सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलतर्फे छप्पन मेरु मंदिरानजीक विद्यार्थ्यांच्या वतीने देशी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी पाचपुते बोलत होते.
येथील विद्या प्रतिष्ठान स्कूलने राबविलेला प्रायोगिक प्रकल्प उल्लेखनीय आहे. या शाळेने एक मूल, एक झाड आणि एक टॅंकर पाणी अंतर्गत पर्यावरण बांधिलकी जपली आहे. शाळेची ही संकल्पना यशस्वी ठरली तर राज्यात हा पॅटर्न पथदर्शी ठरू शकते असे मत पाचपुते यांनी व्यक्त केले.
पालकांनी या प्रायोगिक उपक्रमात आपल्या पाल्यासह सहभाग नोंदवून तब्बल बारा फुटी देशी वृक्षांची लागवड केली आहे. तसेच सर्वांकडून आलेले पाण्याचे टॅंकर वापरले जाणार आहे. प्रत्येक महिन्यात दोन टँकर पाण्याची तरतूद सर्वांच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती प्राचार्य योगेश पाटील यांनी दिली. हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाला तर शिक्षणाबरोबरच पर्यावरणीय बांधीलकी जोपासली जाईल. परंतु विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणीय प्रेम व स्थानिक भूगोल, स्थानिक वृक्ष यांचे महत्त्व व जागरूकता प्रत्यक्षपणे रुजविली जाईल असे या उपक्रमाचे महत्त्व पाटील यांनी अधोरेखित केले.
याप्रसंगी स्कूलचे प्राचार्य योगेश पाटील, बांबू वनस्पती अभ्यासक अनिल माने, गणपत भोंडवे, उषाताई भोंडवे, पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
फोटो - सुपे येथील छप्पन मेरु महादेव परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.