दहापैकी चाैघांमध्ये आढळतोय बालदमा; पुण्यातील प्रदूषणात वाढ झाल्याने मास्क वापरण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:09 AM2024-01-17T10:09:22+5:302024-01-17T10:11:53+5:30

दररोज ओपीडीमध्ये येणाऱ्या १० रुग्णांपैकी ४ रुग्णांमध्ये बालदम्याचे निदान होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे....

Childhood asthma is found in four out of ten; Advice to use masks due to increase in pollution in Pune | दहापैकी चाैघांमध्ये आढळतोय बालदमा; पुण्यातील प्रदूषणात वाढ झाल्याने मास्क वापरण्याचा सल्ला

दहापैकी चाैघांमध्ये आढळतोय बालदमा; पुण्यातील प्रदूषणात वाढ झाल्याने मास्क वापरण्याचा सल्ला

पुणे : अवकाळी पडलेला पाऊस, त्यानंतर जाणवणारी थंडी आणि पहाटे शहरावर पसरणारे धुके अशा संमिश्र वातावरणामुळे श्वसनविकारात झपाट्याने वाढ हाेत आहे. त्यामुळे सध्या झपाट्याने बदलणारे हवामान आणि पहाटे पडणारे धुके यामुळे लहान मुलांमध्ये खोकला आणि दमा यांसारखे आजार वाढल्याचे दिसून येत आहे. दररोज ओपीडीमध्ये येणाऱ्या १० रुग्णांपैकी ४ रुग्णांमध्ये बालदम्याचे निदान होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

हिवाळा हा श्वसन विकाराच्या समस्यांना आमंत्रण देतो, तर या दिवसांत ॲलर्जीची लक्षणेही अधिक तीव्र होतात. या समस्या विशेषतः बालदमा असलेल्या मुलांमध्ये अधिक दिसून येतात. यामध्ये श्वासनलिकेवर सूज आल्यामुळे अथवा श्वासनलिकेमध्ये एक चिकट पदार्थ जास्त प्रमाणात स्रवल्यामुळे श्वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्वासोच्छवास प्रक्रियेत अडचणी येतात. मुलांकडून श्वास बाहेर टाकताना छातीतून सतत शिट्टीसारखा आवाज येत असल्यास त्याला बालदमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते. प्रदूषित वातावरण, तसेच गर्दीच्या ठिकाणी मुलांनी मास्कचा वापर करावा.

याबाबत इंटर्नल मेडिसिन एक्सपर्ट डॉ.सम्राट शहा म्हणाले की, पुण्यातील बदलते वातावरण, वाढते प्रदूषण, श्वसन संसर्गाचे वाढते प्रमाण ही या समस्येमागची तीन प्रमुख कारणे आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ब्राँकायटीसचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळेही १५-२० दिवस खोकला बरा होत नसल्याच्या तक्रारींनी बालरुग्ण ओपीडीमध्ये दाखल होत आहेत. मुलांमध्ये घशासंबंधी विकार आढळताच, पालकांनी त्यांना मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगावे, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे आणि सकस व ताजा आहार द्यावा.

पेडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट डॉ.विश्रृत जोशी म्हणाले की, सकाळच्या थंड वातावरणात धुक्याचे प्रमाण अधिक असते, अशा वेळी व्यायाम करणे टाळा. घराबाहेर पडताना उबदार कपडे घालायला विसरू नका. रूम हीटर वापरण्यापूर्वी तो स्वच्छ करावा. कारण वर्षभर न वापरल्यामुळे यामध्ये धूळ आणि बुरशीजन्य संसर्ग झाल्याची शक्यता असते. म्हणून तो वापरण्यापूर्वी त्याची साफसफाई आणि फिल्टर बदलणे गरजेचे आहे.

Web Title: Childhood asthma is found in four out of ten; Advice to use masks due to increase in pollution in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.