भीक मागण्यासाठी होतो लहान मुलांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:10+5:302021-01-13T04:22:10+5:30

धनकवडी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोलमजुरी करणाऱ्यांच्या हातालाही काम नसल्याने सध्या शहरासह उपनगरांमधील चौका-चौकांत भिकारी, तसेच रस्त्यावर गुजराण करणाऱ्यांच्या संख्येत ...

Children are widely used for begging | भीक मागण्यासाठी होतो लहान मुलांचा सर्रास वापर

भीक मागण्यासाठी होतो लहान मुलांचा सर्रास वापर

Next

धनकवडी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोलमजुरी करणाऱ्यांच्या हातालाही काम नसल्याने सध्या शहरासह उपनगरांमधील चौका-चौकांत भिकारी, तसेच रस्त्यावर गुजराण करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. चौकाचौकांत भिकारी व भिक्षेकरी लहान मुलांच्या उच्छादाने वाहनचालकांसह स्थानिक नागरिक बेजार झाले आहेत.

सातारा रस्ता अहिल्यादेवी चौक, भारती विद्यापीठ, चंद्रभागा चौक, कात्रज चौक, मुख्य देवस्थाने तसेच उपनगरात कुठेही फिरताना हातात देवाचा फोटो घेऊन किंवा लहान बाळाला झोळीत घेऊन भीक मागणारे भिकारी सर्वसामान्यांकडून भीक ‘वसूल’ करतात. वैशिष्ट्य म्हणजे भीक मागण्यासाठी लहान मुलांचा मुक्तपणे वापर केला जात आहे.

अंध, अपंगच नाहीत तर चांगले धडधाकट लोकदेखील ‌भीक मागत नागरिकांचा पिच्छा पैसे दिल्याशिवाय सोडत नाहीत. तरुण तरुणांना या ‌भिकाऱ्यांकडून अधिक टार्गेट करण्यात येत आहे. तरुणांचा शर्ट पकडून तसेच तरुणींची ओढणी पकडून भीक देण्याचा आग्रहच धरला जातो. भीक न दिल्यास अर्वाच्य भाषेत उत्तर दिले जात असल्याचा अनुभव भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या गौरी पाटील-भेलके यांनी सांगितला.

चौकट

वचक नसल्याने स्थानिकांची गैरसोय

भिकाऱ्यांना नियंत्रित करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात भिकाऱ्यांकडून सुरक्षित वावराचा फज्जा उडत आहे. कारवाईअभावी शहरात सिग्नलवर, तसेच चौकात या लोकांचा वावर वाढला आहे. दरम्यान लॉकडाउनच्या काळात तर भिकाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे. त्यांच्यावर कुणाचाच वचक नसल्याने स्थानिकांची गैरसोय होत असून, पोलीस आणि महापालिकेने त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

‘भिक्षेकरी प्रतिबंधक कायदा १९५९’चा पाच वर्षांपासून पाठपुरावा

‘भिक्षेकरी प्रतिबंधक कायदा १९५९’चा वापर सक्तीने करावा, या मागणीसाठी मागील ५ वर्षांपासून राष्ट्रशक्ती संघटना शासकीय पातळीवर प्रयत्न करीत आहे. संघटनेने शहरातील भिकारी व रस्त्यावरील लहान मुलांचा सर्व्हे केला. त्यात सुमारे १०,४२७ लहान मुले रस्त्यावर आढळून आली होती. यामध्ये ५८.१ टक्के मुले व ४१.७ टक्के मुली होत्या. त्यापैकी ४२ टक्के मुले ही उघड्यावर शौचास जातात हे वास्तव उघड झालेले होते.

Web Title: Children are widely used for begging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.