लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जग वेगाने बदलतंय. आधुनिकता व विज्ञान यांचा स्वीकार करून पुढे जाण्याचे हे दिवस आहेत. ई-लर्निंग स्कूलमुळे शिकविण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. आता मुलांवर संगणकाचे संस्कार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केले.
कर्वेनगर येथील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूलचे उद्घाटन शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार, माजी महापौर अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक दीपक मानकर, बाबूराव चांदोरे, सायली वांजळे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, आयटीच्या माध्यमातून रोजगाराचे नवी दालने सुरू झाली आहेत. देशात पुणे, हैदराबाद व बेंगळुरू ही शहरे आयटीचे हब म्हणून विकसित झाली आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. एकट्या पुण्याचा विचार केला तर आकुर्डी, मगरपठ्ठा, या ठिकाणी ८० ते ८५ हजार तरुण काम करीत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी केले. प्रास्ताविक स्वप्निल दुधाने यांनी केले, तर आभार दीपाली धुमाळ यांनी मानले.
----------------------
डॉ. कलाम यांना शास्त्रीय संगीताची आस्था :
डॉ. कलाम यांच्याविषयी आठवणी सांगताना पवार म्हणाले, मी जेव्हा संरक्षणमंत्री होतो, तेव्हा डॉ. कलाम हे दोन वर्षे माझे सल्लागार म्हणून काम पाहिले होते. त्यांचे अत्यंत साधे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केवळ १ रुपया पगार घेतला. त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. तेव्हा त्यांच्या घरी कोणीही नव्हते. ते एकटेच बसून रियाज करीत बसले होते. त्यांना शास्त्रीय संगीताविषयी नितांत आस्था असल्याचे यावेळी पवारांनी सांगितलं.