Corona Vaccination | मुलांना शाळांमध्येही मिळणार Corbevax लस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 11:54 AM2022-03-31T11:54:31+5:302022-03-31T11:56:20+5:30
१ एप्रिलपासून महापालिकेच्या ३० दवाखान्यांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे
पुणे : कोरोना लसीकरण (corona vaccination) मोहिमेमध्ये १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू झाले आहे. आतापर्यंत शहरात या वयोगटातील ७ हजार ६८१ जणांना कॉर्बेव्हॅक्स लसीचा (Corbevax vaccine) पहिला डोस देऊन झाला आहे. लसीकरणाचा वेग वाढावा, यासाठी शाळांनाही लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. पाच शाळांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १ एप्रिलपासून महापालिकेच्या ३० दवाखान्यांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जून महिन्यामध्ये चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्याने केंद्र सरकारने १६ मार्चपासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली. शहरातील या वयोगटातील लोकसंख्या साधारणपणे पावणेदोन लाख आहे. सुरुवातीला केवळ मोजक्या केंद्रांवर लसीकरणास सुरुवात करण्यात आली. मात्र, शाळांच्या वेळा, परीक्षा अशा विविध कारणांनी या वयोगटाचे लसीकरण संथगतीने सुरू होते.
शाळांमध्ये लसीकरणाला परवानगी मिळावी असा प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाल होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही शाळांमध्ये लसीकरण सुरू करण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाळांकडून झालेल्या मागणीवर निर्णय घेऊन पुणे शहरात पाच शाळांमध्ये शुक्रवारपासून लसीकरण सुरू करण्यात आले.
चार दिवसामध्ये शाळांमध्ये सुमारे ८०० मुलांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. महापालिकेतर्फे कॉर्बेव्हॅक्स लस ३० दवाखान्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कॉर्बेव्हॅक्स, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या तिन्ही लसी महापालिकेच्या हद्दतील 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या महापालिकेची 69 रुग्णालायांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.