पुणे : आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांना गेल्या दोन-तीन महिन्यांत अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे या राज्यातील मिरचीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी पुण्यात मागणीच्या तुलनेत पुरवठ्यावर परिणाम झाला असल्यानेच हिरवी आणि लाल मिरची महाग झाली आहे. तसेच येत्या काही महिन्यांत अशीच परिस्थिती राहणार असल्याने मिरचीचे आणखी दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
हिरवी मिरची दीडशे पार
पुणे शहरात मागणीच्या तुलनेत हिरव्या मिरचीची आवक कमी आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून हिरव्या मिरचीचे प्रतिकिलोचे दर १५० रुपयांच्या पुढे गेले आहेत.
लाल मिरचीही झोंबतेय
पुणे शहरात दोन महिन्यांपूर्वी लाल मिरचीचे दर १४० ते १५० रुपये प्रतिकिलो होते. मात्र, मध्यंतरी अवकाळी पावसामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील लाल मिरचीला फटका बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले असून, त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. सध्या शहरात प्रतिकिलोचे दर १८० ते २०० रुपयांपर्यंत गेले आहेत.
आवकही घटली
गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून हिरव्या मिरचीची केवळ ८ ते १० ट्रक, तर लाल मिरचीचे केवळ दोन ट्रक दररोज आवक होत आहे. अवकाळीमुळे उत्पादनावर मोठ्या परिणाम झाल्याने मागील काही दिवसांत आवकीवर विपरीत परिणाम झाला आहे.
...म्हणून वाढले भाव
प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन स्वयंपाकात मिरचीची गरज लागतेच. त्याशिवाय स्वयंपाक शक्य नाही. मात्र, मिरची उत्पादक राज्यातील उत्पादन अवकाळी पावसाने घटले आहे. त्यामुळे मुख्यत: मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने हिरवी मिरची आणि लाल मिरचीच्या दरात जवळपास ५० रुपयांची दरवाढ झाली आहे.
- राजेंद्र गुगळे, मिरचीचे व्यापारी
ताटातून हिरवी मिरची गायब
गेल्या दोन आठवड्यांपासून मिरचीचे दरात वाढ झाली आहे. मी तेव्हाचे दोन किलो मिरची घेऊन ठेवली आहे. मात्र, येणारे काही दिवस अथवा महिनाभर असेच दर वाढत राहिले तर स्वयंपाकात भाजीसाठी मिरची वापरणे आम्हाला अवघड होईल. कारण रोजंदारीवर आम्ही काम करत असल्याने महागाईमुळे आम्हाला संसार चालवताना आधीच कसरत करावी लागत आहे.
- सुनीता हारगुडे, गृहिणी