विमानात उलटी करणारा चिनी प्रवासी 'निगेटीव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 04:06 PM2020-02-09T16:06:52+5:302020-02-09T16:08:02+5:30
दिल्लीहून पुण्यात येणाऱ्या विमानात उलटी करणाऱ्या चिनी प्रवाशाचे नमुने निगेटीव्ह असल्याचे समाेर आले आहे.
पुणे : दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानामध्ये शुक्रवारी उलटी केलेल्या 31 वर्षीय चिनी प्रवाशाच्या तपासण्या निगेटीव्ह आल्या असून, काेराेनाची काेणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे महापालिकेचे आराेग्यप्रमुख डाॅ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले. या प्रवाशाला डाॅ. नायडू रुग्णालयामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले असून अजून दाेन दिवस हा प्रवासी दवाखान्यात राहील.
काेराेना विषाणूंचा भारतात प्रसार हाेऊ नये, याकरिता आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. शुक्रवारी एअर इंडियाच्या विमानातून आलेल्या चिनी प्रवाशाला विमानातच उलट्या झाल्या. हा प्रवासी काेलकात्यात उतरला हाेता. तेथून भुवनेश्वर, विशाखापट्टणम, काेलकाता, दिल्ली आणि पुणे, असा त्याने प्रवास केला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता पाेहचलेल्या विमानाची जंतुनाशकाद्वारे स्वच्छता केली. या प्रवाशाच्या तब्येतीबाबत माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने त्याला डाॅ. नायडू रुग्णालयात दाखल केले. त्याचे नमुने राष्ट्रीय विषानुविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी त्याचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला. गुरुवारी रात्री दाेन जणांना दाखल करण्यात आले हाेते. यामध्ये पुण्याच्या 27 वर्षीय आणि चेन्नईच्या 32 वर्षीय तरुणांचा समावेश असून त्यांचेही अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
दरम्यान, 8 फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 हजार 84 प्रवासी तपासले. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून 140 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खाेकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विलगीकरण कक्षात 35 जणांना भरती केले आहे. यामध्ये शुक्रवारी सायंकाळी कस्तुरबा रुग्णालयात भरती केलेल्या मूळच्या केरळमधील आणि वुहान शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दाेन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.