पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक (raghunath kuchik) यांच्याशी आपला वाद होता. मात्र, त्यांच्याविरुद्ध तक्रार करायची नव्हती. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास तसेच सुसाईड नोट लिहिण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. वाघ यांनीच आपल्याला पोलिसांकडे विशिष्ट जबाब द्यायला भाग पाडलं, असा गौप्यस्फोटही पीडितेने केला आहे.
रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्धच्या बलात्कार प्रकरणात मंगळवारी नवे वळण मिळाले. या तरुणीला मदत केलेल्या चित्रा वाघ यांच्यावरच तिने आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. या तरुणीने सांगितले की, चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे आहेत. विशिष्ट यंत्रणा वापरून माझ्या मोबाइलवरून कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाइलवरून मला मेसेज येत आहेत, असा दावाही पीडित तरुणीने केला आहे.
महमंद अंकल उर्फ चाचा पुरवित होता वाघ यांना माहिती
महंम्मद अहमद अंकल उर्फ चाचा यांना वडीलकीच्या नावाने मी कुचिक यांच्याबरोबरचे संबंध तसेच गरोदर असल्याची माहिती दिली. त्यांनी कुचिक यांची माहिती घेऊन त्यांच्याकडे सदनिका तसेच पैसे मागणी करू लागले. यादरम्यान, त्या चाचांनी मागणी मान्य न केल्यास गुन्हा दाखल करण्यास सांगितले. परंतु, मी त्यास विरोध केला होता. दुसऱ्या वेळी आजारपणाचा फायदा घेऊन त्या काकांनी गुन्हा दाखल करण्याबाबतचा सर्व प्रकार केला. सुुरुवातीपासूनच वाघ यांचा रोख कुचिक यांच्यावर होता. चाचा सर्व माहिती वाघ यांना पुरवित होते. त्यानंतर जनसंपर्काचे काम पाहणारे दोघे ही सर्व माहिती वाघ यांना पाठविण्याचे काम करत होते. या सर्वांनी माझ्यावर दबाव आणला होता. त्यांच्याकडून मला वारंवार फोन करून तक्रार करायला सांगण्यात आल्याचेही पीडितेने सांगितले.
डांबून ठेवले,पत्रकार परिषदेत जबरदस्तीने बोलायला लावले
तक्रार केल्यानंतर माझे अपहरण झाले होते. काही काळानंतर माझी शुद्ध हरपली जेव्हा जाग आली तेव्हा मी एका घाटात एका चारचाकीत होते. तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई येथील पत्रकार परिषदे वेळीही लीलावती हॉस्पिटल येथे डांबून ठेवले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत आणत जबरदस्तीने बोलण्यास भाग पाडल्याचा आरोपही तिने केला.