ससून रुग्णालय, पोलिस, तुरुंग प्रशासनाची करा सीआयडी चौकशी; रवींद्र धंगेकर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 11:20 AM2023-10-05T11:20:14+5:302023-10-05T11:20:33+5:30
ललित पाटील गंभीर आजारी होता, तर पोलिसांना हिसका देऊन त्यांच्या पेक्षा वेगाने ताे पळाला कसा?
पुणे: ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील हा तेथून अमली पदार्थाचे रॅकेट चालवत होता. पोलिसांनी पकडल्यावर तो तेथून पळून गेला. हा सारा घटनाक्रम संशयास्पद असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ललित पाटील गंभीर आजारी होता, तर पोलिसांना हिसका देऊन त्यांच्या पेक्षा वेगाने ताे पळाला कसा? तसेच ताे वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेत होता, हेही संशयास्पद आहे. हा सारा घटनाक्रम शासकीय यंत्रणेला चक्रावून टाकणारा आहे. पोलिस, ससून आणि तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय हे घडणे शक्य नाही, असे धंगेकर यांनी गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
विविध गुन्ह्यांखाली अटकेत असणारे अनेक कुख्यात गुन्हेगार उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल होतात आणि ऐशोआराम करतात, असे माध्यमात आलेल्या वृत्तांवरून स्पष्ट होते. कुख्यात मटका किंग वीरल सवलाही अशीच सेवा या तीनही शासकीय यंत्रणांकडून घेत आहे. सामाजिक जीवनात वावरताना अशा अनेक घटना कानावर येत असतात. त्यामुळे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील समाजमन भयभीत झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई होणे आवश्यक आहे.