विश्रांतवाडीतील खाण हाेतीये डंपिंग ग्राऊंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 07:38 PM2018-10-07T19:38:22+5:302018-10-07T19:39:44+5:30
विश्रांतवाडी भागात असणाऱ्या पाण्याच्या खाणीमध्ये सातत्याने कचरा फेकला जात असल्याने या खाणीचे एकप्रकारे डंपिंग ग्राऊंड झाले अाहे.
पुणे : विश्रांतवाडी भागात असलेल्या खाणीत नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याने या खाणीचे रुपांतर हळू हळू डंपिंग ग्रांऊंड हाेत असल्याचे चित्र अाहे. या खाणीत टाकण्यात येणारा कचरा कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्नही निर्माण झाला अाहे.
पुण्यातील विश्रांतवाडी भागात शहरातील माेठी खाण अाहे. या खाणीच्या अाजूबाजूला रहिवाशी क्षेत्र अाहे. अनेक नागरिकांनी या खाणीत अात्महत्या केली असल्याने ही खाण अात्महत्येसाठी कुप्रसिद्ध अाहे. या खाणीच्या चारही बाजूंनी भिंत असली तरी ती फार उंच नाही. धानाेरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाच ही खाण अाहे. येथून जाणारे काही नागरिक या खाणीत कचरा तसेच निर्माल्य टाकत असल्याने या खाणीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले अाहे. हे पाणी स्थिर असल्याने तसेच नागरिकांकडून सातत्याने कचरा टाकण्यात येत असल्याने खाणी जवळून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत अाहे. त्याचबराेबर या खाणीच्या बाजूला लाेकवस्ती असल्याने नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्नही निर्माण झाला अाहे.
दरम्यान, शहरातील अनेक भागात माेकळ्या खाणी असून या खाणींना संरक्षण भिंती नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. त्यामुळे या खाणींना संरक्षक भिंत उभारण्याची मागणी करण्यात येत अाहे.