चासकमान : साकुर्डी (ता. खेड) या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निर्मळवाडी ते उपाळवाडी आदी वाड्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे मागणी करूनदेखील रस्ताच उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.निर्मळवाडी गावातील उपाळवाडी, लोहकरेवाडी, टोकेवाडी आदी वाड्यांमध्ये ३०० ते ४०० लोकांची नागरी वस्ती आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. परंतु या वस्त्याकडे जाण्यासाठी अद्याप रस्ताच झाला नसल्याने नागरिकांना शेताच्या बांधावरून वाट काढत प्रवास करावा लागतो. आम्ही गावचे नागरिक आहोत की नाही आणि असू तर मग असा अन्याय का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना शेतात गुडघ्या एवढा गाळ तुडवत वाट काढत प्रवास करावा लागत आहे. तर वाडीतील एखादा नागरिक अजारी पडला तर पुढील उपचारासाठी नेताना नागरिकांना झोळी करून न्यावे लागते. यामुळे एखादी अकस्मिक घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.मुख्य व्यवसाय शेती असल्याने परिसरात शेतक-यांना पावळ्यात शेती पासून एकमेव उत्पन्न निघत असते. परंतु शेतात जाण्यासाठी तसेच मालाची ने आण करण्यासाठी रस्ताच नसल्याने अडचणी येत आहेत. साकुर्डी येथील शाळेमध्ये जाण्यासाठी जवळपास 30 विद्यार्थ्यांना पाण्याचा प्रवाह आणि धोकादायक पायवाट ओलांडून जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन तात्काळ रस्ता तयार करुन देण्याची मागणी चिंधू लोहकरे, तुकाराम गाडेकर, रामदास लांघी, चिमाजी लोहकरे, ज्ञानेश्वर लोहकरे, महादू लोहकरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.>आमची संपूर्ण हयात गेली; परंतु आमच्याकडे अद्याप रस्ताच झाला नाही. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नाही. आमच्या घराकडं कुठल्याही प्रकारचे वाहन येत नाही. आमच्याकडे दोन महिने लाईट नाही.- गीताबाई लोहकरे>आम्हा विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतर पार करून शाळेत जावे लागते. शाळेत जाताना शेताच्या बांधावरून, ओढ्यातून जावे लागते. एखादा मोठा पाऊस झाल्यावर पूर येत असल्याने आमची शाळा बुडते. कधी कधी आमचे आई-वडील शाळेत सोडण्यासाठी येतात. आमची रस्त्याची सोय व्हावी.- रोशन लांघी
रस्ता नसल्याने नागरिकांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:49 PM