नागरिकांनीच ठेवावा आता अवैध धंद्यांवर ‘वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:42 AM2019-12-11T11:42:56+5:302019-12-11T11:56:39+5:30

शहरातील अवैध धंद्यांची माहिती वेबसाइटवर

Citizens should keep 'watch' on illegal occupations | नागरिकांनीच ठेवावा आता अवैध धंद्यांवर ‘वॉच’

नागरिकांनीच ठेवावा आता अवैध धंद्यांवर ‘वॉच’

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस आयुक्त डॉ़ के. व्यंकटेशम यांचे आवाहन :संपूर्ण पुणे शहर : जवळपास दीड हजार अवैध धंदे सुरू

विवेक भुसे- 
पुणे : शहरात मटका, जुगार, गावठी दारू हे अवैध धंदे बोकाळले असल्याचे नागरिकांना जागोजागी दिसून येतात़. त्याचवेळी पोलीस अधिकारी आपल्या हद्दीत कोठेही अवैध धंदे चालू नसल्याचे छातीठोकपणे सांगत असतात़. पोलीस आणि अवैध धंदेवाल्यांची मिलीभगत असल्याचे लोकांचे म्हणणे असते़. पोलिसांना हप्ते दिल्याशिवाय कोणती गोष्ट होत नसल्याचे लोकांना वाटत असते़. ही चर्चा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे़. यावर पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांनी नवा उपाय योजला आहे़. त्यांनी नागरिकांनाच आवाहन केले आहे की, आपल्या परिसरातील अवैध धंद्यांवर नागरिकांनी वॉच ठेवावा.

ग़ेल्या ५ वर्षांत पुणेपोलिसांनी ज्या ज्या ठिकाणी धाडी टाकून अवैध धंदे होत असल्याबद्दल कारवाई केली, अशा सर्व ठिकाणांची यादी शहर पोलीस दलाच्या वेबसाइटवर टाकण्यात येत आहे़ नागरिकांनी ही यादी पाहून आपल्या परिसरात अवैध धंदे सुरु असल्यास त्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी़ पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार आहे़ 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने शहरातील जुगार अड्डे व दारूविक्रीच्या ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली़. त्यातूनच शहरात राजरोसपणे अवैध धंदे सुरु असल्याचे स्पष्ट झाले होते़. याबाबत पोलीस आयुक्त डॉ़. व्यंकटेशम यांनी माहिती घेतली़. तसेच या धंदेवाल्यांकडून हप्ते वसूल करणारे कोण कोण आहेत, याची माहिती घेतली़. त्यातूनच काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेतील तिघा पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली़. मात्र, शहरातील पोलीस ठाणे व पोलीस चौकी यांच्याकडून होणाऱ्या हप्तेखोरीवर कसा लगाम घालावा, यासाठी त्यांनी अवैध धंद्यांची यादी जाहीर करण्याचे ठरवले़. 
या अवैध धंदेवाल्यांना त्या परिसरातील राजकीय नेते, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे सरंक्षण असते़. त्यांच्याकडून त्यांना नियमित हप्ते जातात, असे सांगण्यात येते़.
याबाबत पोलीस आयुक्त डॉ़ के. व्यंकटेशम यांनी सांगितले की, शहरात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत़. पण ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही तर समाजाचीही जबाबदारी आहे़.  आपल्या भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी़,  यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे़. पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर अवैध धंद्यांची यादी प्रसिद्ध करत आहोत़. आपल्या भागात त्यातील कोणते धंदे सुरू आहेत, याची माहिती नागरिकांनी आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिल्यास त्यावर नक्की कारवाई होईल़ हे धंदेवाले किती जणांना हप्ते देणाऱ ,शेवटी त्यांच्यावरही काही मर्यादा येणार आहे़. अवैध धंदे बंदसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे़. 
......
केवळ पोलिसांनी केलेल्या कारवाया लक्षात घेतल्या तरी एकट्या पुणे शहरात जवळपास दीड हजार अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे़. याशिवाय पोलिसांच्या नजरेआड लॉजेस, पंचतारांकित हॉटेलमध्ये बड्या हस्तींचा जुगार अड्डा जमतो तो वेगळाच़..
.....
* पुणे शहरात या वर्षाभरात सोमवार ९ डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ४३५ जुगार प्रतिबंधक कारवाया झाला आहेत़. त्यावेळी दारुबंदी कायद्यान्वये ९९६ कारवाया करण्यात आल्या आहेत़.
...............
पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी फोन केल्यावर कोणी हा फोन केला, त्यांना आपले नाव न सांगण्याची मुभा आहे़. 
या कॉलची दखल घेऊन त्यावेळी कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची माहिती कळविली जाते़. 
ते प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन असा काही धंदा सुरू आहे अथवा नाही, याची खात्री करतात़. त्यावर काय कारवाई केली, याची माहिती देणे बंधनकारक आहे़.
....
* पोलीस वेबसाइटवर शहरातील अवैध धंद्यांची यादी जाहीर करत आहेत़ ही यादी पाहून नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविल्यास त्यावर नक्कीच कारवाई होईल़. शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे़ - डॉ़ के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे.
.......

अवैध धंदा आढळल्यास १०० नंबरवर करा कॉल
आपल्या परिसरात दारू, मटका, जुगार, पत्त्याचा क्लब अशा प्रकारे कोणताही अवैध धंदा सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी १०० नंबरवर कॉल करावा़ ज्यांनी ही माहिती दिली त्यांनी आपले नाव सांगायची गरज नाही़ आपण संबंधित धंद्याची माहिती दिल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाकडून त्या ठिकाणी पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी रवाना होतात. ते त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात आणि याची माहिती नियंत्रण कक्षाला देतात़ धंदा सुरू असल्याचे दिसल्यास पोलिसांकडून संबंधितांच्या विरोधाधत कारवाई केली जाते़ तशी नोंद संबंधित पोलीस ठाण्याला केली जाते़ तसेच दिलेल्या कॉलचे काय झाले याची माहिती देखील नियंत्रण कक्षाला कळविण्याचे बंधनकारक आहे़ यावर वरिष्ठ अधिकाºयांची देखरेख असते़ 

 

Web Title: Citizens should keep 'watch' on illegal occupations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.