शहरातील ६०३ कुटुंबे कासावीस

By admin | Published: January 4, 2015 01:00 AM2015-01-04T01:00:10+5:302015-01-04T01:00:10+5:30

आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा जवळ नाहीये, तर काहींच्या कुटुंबाचा प्रमुख आधारच निघून गेलाय. आजी आणि नातू यांची ताटातूट झालीय.

The city has 603 families | शहरातील ६०३ कुटुंबे कासावीस

शहरातील ६०३ कुटुंबे कासावीस

Next

मंगेश पांडे ल्ल पिंपरी
आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा जवळ नाहीये, तर काहींच्या कुटुंबाचा प्रमुख आधारच निघून गेलाय. आजी आणि नातू यांची ताटातूट झालीय. एकमेकांच्या जीवाभावाच्या नात्याच्या व्यक्तींमध्ये अंतर पडलेय. बेपत्ता झालेल्या व्यक्ती शोधून सापडत नाहीत. पोलीस ठाण्यांत चकरा मारूनही माहिती मिळत नाही. पायाला भिंगरी बांधल्यागत आपल्या जवळच्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या आप्तेष्ट, नातेवाइकांचा जीव त्यांच्या प्रतीक्षेत कासावीस झाला आहे.
बेपत्ता होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसरीकडे बेपत्तांचा शोध लागण्याचे प्रमाण अल्प आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनच्या हद्दीतील आठ पोलीस ठाण्यांत वर्षभरात १२७६ जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली. यातील ६७३ जणांचा शोध लागला. मात्र, अद्यापही ६०३ जण बेपत्ता आहेत.
परिमंडळ तीनच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड, सांगवी, हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी, वाकड, दिघी ही पोलीस ठाणी आहेत. शहराची लोकसंख्या अठरा लाखांच्या घरात आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होत आहे. गेल्या वर्षात निगडी पोलीस ठाण्यात तब्बल ३१३ व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद झाली. त्यांपैकी १७५ व्यक्ती सापडल्या.
पालकांनी रागावणे, मनासारखी एखादी गोष्ट न होणे या कारणांमुळे अल्पवयीन मुले घरातून निघून जातात. तर मोठ्या व्यक्ती आर्थिक अडचण, घरगुती वाद, असाध्य आजार, कुटुंबीयांचा प्रेमविवाहास विरोध यामुळे घरातून निघून जात असल्याचे समोर येत आहे. एखाद्या व्यक्तीचा शोध घेऊनही ती व्यक्ती न आढळल्यास बेपत्ता झाल्याची तक्रार दिली जाते. चोवीस तास सर्वत्र शोध घेतल्यानंतर बेपत्ता असल्याची तक्रार घेण्याची तरतूद आहे.
पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर वायरलेसवर संदेश पाठवून संबंधित व्यक्तीचे छायाचित्र पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाते. यासह बेपत्ता व्यक्तीकडे मोबाईल असल्यास त्याचे ‘लोकेशन’ मिळविणे, ठिकठिकाणी पत्रके चिकटविणे, वर्णनावरून इतरत्र माहिती मिळाल्यास त्याची शहानिशा करून पाठपुरावा करणे, नातेवाइकांकडे चौकशी करणे आदी यंत्रणा पोलिसांकडून राबविली जाते. मात्र, मनुष्यबळाअभावी त्यालाही मर्यादा येतात. बेपत्ताची तक्रार दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच ती व्यक्ती पुन्हा घरी आल्याचे प्रकारही घडतात. क्वचित प्रकरणांत नागरिक याबाबत पोलिसांना माहिती देतात. अनेकदा बेपत्ता झाल्याची नोंद तशीच राहते.
तेरा वर्षांखालील मुलांना पूर्ण समज नसते. ते स्वत:हून निघून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तेरा वर्षांखालील मुलांची बेपत्ता असल्याची तक्रार आल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेतला जातो. बेपत्ता व्यक्ती प्रतिष्ठित असल्यास अथवा त्यांच्या कुटुंबीयांकडून जोरदार पाठपुरावा होत असल्यास अशा व्यक्तींचा शोध घेण्यात पोलीस तत्परता दाखवितात.

बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लहान मुलांसह तरूण-तरूणींचे प्रमाण अधिक आहे. अल्पवयीन मुले किरकोळ कारणावरून तर तरूण-तरूणी प्रेमसंबंधातून बेपत्ता झाल्याचे तपासात समोर येते. तेरा वर्षांखालील बालक हरविले असल्यास त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेतला जातो. बेपत्ताची तक्रार आल्यास तातडीने वायरलेसवर संदेश पाठविण्यासह संबंधित व्यक्तीचे छायाचित्र प्रसिद्ध करून शोध घेतला जातो.
- रमेश भुरेवार, सहायक पोलीस आयुक्त

मनाप्रमाणे मागण्या पूर्ण होत नसल्याने निराशेतून अल्पवयीन मुले घर सोडतात. बऱ्याच मुलांना अभ्यासात अडचणी असतात. यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. मुलांशी चर्चा करून अडचणी जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच बेपत्ता असलेल्या मोठ्या व्यक्तींमध्ये मानसिक आजार असलेल्यांचे प्रमाण जास्त असते.
- डॉ. किशोर गुजर, मानसोपचार तज्ज्ञ

४काळजाचा तुकडा असलेल्या मुलाच्या काळजीने आई-वडिलांना अन्नही गोड लागत नाही. प्रत्येक दिवस योगेशच्या शोधासाठीच सुरू होतो, अशी अवस्था झालीय जऱ्हाड कुटुंबीयांची. योगेश यमाजी जऱ्हाड (वय १८, सध्या रा. काटेवस्ती, दिघी) हा तरूण १७ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे. मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहाटा तालुक्यातील योगेश रांजणगावला नोकरीला आहे. तीन-चार दिवसांसाठी दिघीला बहिणीकडे आला होता. बाहेर जाऊन येतो असे सांगून गेलेला योगेश घरी परतलाच नाही. तसेच मूळ गावी आणि रांजणगावलाही पोहोचला नाही. कुटुंबात सर्वांत छोटा असल्याने योगेशच्या शोधासाठी सर्व कुटुंबच माहिती मिळेल तिकडे धाव घेत आहे.

४पद्मजा पुरूषोत्तम गोसावी (वय ६०, रा. समर्थ रेसिडेन्सी, सावतामाळी मंदिराजवळ, पिंपरीगाव) या १३ डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. ठिकठिकाणी शोध घेऊनही तपास लागत नसल्याने गोसावी कुटुंबीय चिंतेत आहे. घरात त्यांची कमतरता जाणवत असून घरही सुने सुने वाटत आहे. त्यांचा मुलगा प्रशांत सर्वच स्तरांत शोध घेत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दिली असली, तरी केवळ त्यावर अवलंबून न राहता प्रशांत आईच्या शोधार्थ फिरत आहेत. घरातून अचानक गायब झाल्याचे कुटुंबीयांना माहिती असले, तरी छोट्या नातवाला याबाबत कल्पना नाही. त्याचे बोबडे बोल आई-वडिलांकडे आजीबाबत विचारणा करीत आहेत.

४व्यवस्थित बोलता येत नाही की, समोरच्याने बोललेले समजत नाही. अशा मुन्नाचा संस्थेतील सर्वांनाच लळा लागला होता. देहूरोड येथे सापडलेल्या मुन्नाला तळवडे, रूपीनगर येथील एका सेवाभावी संस्थेत दाखल केले होते. येथे त्याची काळजी घेत कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळले जात होते. महिनाभरापूर्वी मुन्ना अचानक बेपत्ता झाला. संस्थेतील कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनीही त्याचा निगडी, भोसरी, देहूरोड, पिंपरी आदी ठिकाणी शोध घेतला. मात्र, तपास लागला नाही. त्याला व्यवस्थित बोलता येत नसून, स्वत:चे नाव, पत्ताही सांगता येत नाही. त्यामुळे संस्थेचे कर्मचारीही काळजीत आहे. संस्थेतील कर्मचारी एखाद्या कुटुंबीयांप्रमाणेच त्याचा शोध घेत आहेत.

४पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी मुलगा वणवण फिरत आहे. कोठेही शोध लागत नाहीये. पोलीस ठाण्याच्याही अनेक चकरा मारून झाल्या. मात्र, पदरी निराशाच पडत आहे. गणपत रामराव वाघमारे (वय ४५, रा. जाधव शाळेजवळ, समर्थनगर, दिघी) हे १५ डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. कुटुंबाचा आधारच निघून गेल्याने कुटुंब अडचणीत सापडले आहे. मुलगा मिलिंद शिक्षण घेत केटरिंगचे काम करीत आहे. काम सांभाळून त्याला पप्पांचा शोध घेण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आई घरकाम करते, तर छोटी बहीण शिक्षण घेत आहे. दिघी, भोसरी, आळंदी या ठिकाणांसह मूळ गावीदेखील त्यांचा शोध घेतला. मात्र, तपास लागला नाही.

महिन्याभरातच
अठरा जणांची नोंद
४दिघी पोलीस ठाण्यात महिनाभरातच तब्बल अठरा जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली. त्यांपैकी दहा जणांचा शोध लागला असला, तरी अद्यापही सातजण बेपत्ता आहेत. आत्माराम लोहार (वय २९), योगेश यमाजी जऱ्हाड (वय १८), रणजित दगडू गायकवाड (२५), रक्षा माणिकराव बावसकर (वय ३०), गणपत रामराव वाघमारे (वय ४५), मुरलीधर श्यामराव सूर्यवंशी (वय ४५), प्रिया किशन चिव्हे (वय १८) अशी बेपत्तांची नावे आहेत. बावसकर, वाघमारे आणि गायकवाड हे १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत बेपत्ता झाले आहेत.
४तेरा ते सोळा वयोगटातील मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त आहे. पालकांनी रागावणे, मनासारखी एखादी गोष्ट न होणे या कारणांमुळे या वयोगटातील मुले घरातून निघून जातात. लहान मुलांना पळवून नेण्याचेही अनेक प्रकार घडत आहेत. रस्त्यावर भीक मागण्यासाठी या मुलांचा उपयोग करून घेतला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विशेष मुलांकडे पालकांनी अधिकाधिक लक्ष देण्याची गरज आहे. या मुलांना पूर्ण ज्ञान नसते. ते काय करतात, कुठे जातात याबाबत त्यांनाच समजत नाही.

 

Web Title: The city has 603 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.